Kalyan: कल्याणमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथे रविवारची सुट्टी असल्यामुळे नेहमीप्रमाणे स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. आयुष घोष असं मृत मुलाचे नाव आहे. कल्याण पश्चिमेकडील माधव संकल्प सोसायटीच्या आवारात असलेल्या स्विमिंग पूलमध्ये ही दुर्दैवी घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील माधव संकल्प सोसायटीत आयुष घोष हा बारावीत शिकणारा विद्यार्थी आई वडील आणि बहिणी समवेत राहत होता. आज त्याचे वडील कामानिमित्त शहराबाहेर गेले होते. सोसायटीचे स्विमिंग पूल संध्याकाळी 5 ते 8 या कालावधीत सुरू ठेवले जाते. मात्र यावेळेत पोहण्यासाठी क्लास लावलेल्या आयुषला पुरेसा वेळ सरावाला मिळत नसल्याने तो आज अर्धा तास लवकर स्विमिंग पूलवर गेला. 


आयुष स्विमिंग पूलवर पोचला तेव्हा लाईफ गार्ड पूलाचे पम्पिंग सुरू करण्यासाठी गेला होता. तर दुसरा गार्ड तलावातील कचरा गाळ काढत होता. त्यावेळी त्याची नजर चुकवून आयुष तलावात उतरला, मात्र पोहता येत नसल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दरम्यान लाईफ गार्ड पोचताच त्यांना पाण्यावर तरंगणारा आयुषचा मृतदेह दिसला. या घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढून पुढील तपास सुरू केला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: