Beed: गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी संपण्याचा नाव नाही घेत आहेत. मुंबई, सातारा, कोल्हापूरनंतर आता बीडमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे शहराध्यक्ष स्वप्निल गलधर यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधामध्ये बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. यामध्ये सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे मराठा समाजाला अत्याचारी समाज, असे संबोधित करणे. मराठा आरक्षण संदर्भात वेळोवेळी त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला त्याचबरोबर चर्चेत राहण्यासाठी सदावर्ते यांनी माध्यमांसमोर जाऊन मराठा समाजाच्या भावना वारंवार दुखावल्या आहेत, अशी तक्रार स्वप्निल गलधर यांनी बीड पोलिसात दिली होती.
स्वप्नील गलधर यांनी काय केली तक्रार
स्वप्नील गलधर तक्रारीत म्हणाले आहेत की, 15 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता ते स्वराज्यनगर येथे घरी होते. यावेळी बीड शहरातील एका डॉक्टरांनी व्हॉटसअपवर पाठविलेला व्हिडीओ त्यांनी डाऊनलोड करुन पाहिला. त्यात गुणरत्न सदावर्ते यांनी एका पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबद्दल अपशब्द वापरल्याचे निदर्शनास आले. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासंदर्भात विधान करताना माराठा आरक्षण हे मोगलाई पद्धतीने लुटले जाऊ शकत नाही. पाटीलकी, देशमुखी, राजेशाहीचे राज्य नाही. महागड्या गाड्या आणून लोक जमवले व 52 मोर्चे काढले. मुख्यमंत्र्यांना वेठीस धरुन आरक्षण मिळत नाही.
गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना. अखेर सुप्रिम कोर्टाने अँटी व्हायरस देऊन आरक्षण नेस्तनाबूत केले. याशिवाय दिलीप पाटील यांच्या फेसबुक पेजवरील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ॲड. सदावर्ते यांनी महापुरुषांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे निदर्शनास आले असल्याचे स्वप्निल गलधर आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे.
या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यांमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात 153 अ 295 अ आणि 505 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सदावर्ते यांना तात्काळ अटक न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा स्वप्निल गलधर यांनी दिला आहे. डंके की चोट पर आम्ही सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, असे देखील यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.