पंढरपूर : ऐहिक पारलौकिक फळ देत असताना इहलोकातील सर्व भोग प्राप्त करून देणारी आणि मुक्ती प्राप्त करून देणारी तिथी म्हणजे योगिनी एकादशी, असे या दिवसाचे वर्णन केले जाते. सत्ता संपत्ती यामध्ये सत्ता आल्यावर संपत्ती येते किंवा संपत्ती आल्यावर सत्ता देखील येऊ शकते. मात्र सत्ता आणि संपत्ती हे दोन्ही मिळाल्यावरही समाधान मिळत नाही. यासाठीच वारकरी सांप्रदायात एकादशीचे व्रत हे समाधान प्राप्तीसाठी सांगितले आहे.  जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वचनानुसार,


सदा नामघोष करी हरिकथा!
तेणे सदा चित्ता समाधान!!


एकादशीला हरिकथा आणि नामस्मरण केल्यास चित्तास समाधान प्राप्त होते. योगिनी म्हणजे योग्य अर्थात जोडणारी. परमात्म्याशी जोडणे ज्या व्रताने घडते, ती ही योगिनी एकादशी होय. सगुण भगवंताची गाठ पडणे आणि जीवब्रम्ह ऐक्य होणे, हे या तिथीला होते. म्हणून जीवब्रम्हाचे ऐक्य प्राप्त करून देणारी एकादशी म्हणजे ही योगिनी एकादशी होय. आपण केलेल्या सेवेने 88 हजार ब्राम्हण तृप्त होऊन जेवढे पुण्य मिळते, त्यापेक्षा जास्त पुण्य या योगिनी एकादशीच्या व्रताने मिळते, अशी मान्यता आहे. 


एकादशी म्हणजे, एक असलेल्या परमात्म्याचे चिंतन करणे होय. एक असलेल्या परमात्याचे चिंतन केल्याने मिळणारे फळ 10 अश्वमेघ यज्ञ केल्याच्या पुण्य इतके असते. यातही विशेष भाग म्हणजे यज्ञाने केलेले पुण्य संपल्यानंतर मनुष्यास खाली यावे लागते. परंतु, एक असलेल्या भगवंताचे चिंतन केल्याने प्राप्त होणाऱ्या पुण्याईमुळे साधक जन्ममरणाच्या पलीकडे पोचतो इतके मते, एक असलेल्या भगवंताच्या उपासनेत म्हणजे, एकादशी व्रतात सांगितले आहे. त्यामुळेच या दिवशी स्मरण चिंतनाचे फळ म्हणजेच योगिनी एकादशी व्रताचे फळ हे मुक्तिप्रापक आहे. योगिनी एकादशी ही महापापांचे क्षालन करून महापुण्याचे फळ मिळवून देते. म्हणून या एकादशीला वारकरी सांप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे.