Yoga Day 2022 :  जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने वर्ध्याच्या (Wardha) सेवाग्राम येथील चरखा गृहात योग सत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला, यावेळी शेकडो नागरीक योगा प्राणायम करण्यासाठी एकत्रित आले होते. खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर,जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे वनविभाग अधिकारी राकेश शेपट यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी योगा प्राणायमाचे प्रात्यक्षिक केले.


‘‘जागतिक योग दिन’ निमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा (क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, वर्धा), पर्यटन मंत्रालय, भारत सरकार, आयुष मंत्रालय, भारत सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा, पर्यटन संचालनालय, नागपूर विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 जून 2022 रोजी सकाळी 6.00 वाजता सेवाग्राम येथील चरखा गृह येथे जागतिक योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


यंदा जागतिक योग दिनाचे आठवे वर्ष साजरे करण्यात येत आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार सकाळी 6.00 ते 8.00 या वेळेत नागरीकांसाठी योग सत्र घेण्यात आले. आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने संपुर्ण भारतात 75 ठिकाणी योग दिवस साजरा करण्याची योजना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम या स्थळाची निवड करण्यात आली आहे.योग प्रशिक्षकांमार्फत सहभागींना योगासने आणि त्याचे फायदे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. मन आणि शरीर यांच्यात ताळमेळ साधण्यासाठी योगाचा फायदा आपल्याला कसा होते, याची माहिती या सत्रात देण्यात आली.


कोरोनाकाळात खरी साथ योगाची : खासदार रामदास तडस
योगा अनेक आजारांवर उपाय आहे असे खासदार रामदास तडस कार्यक्रमाप्रसंगी बोलताना म्हणाले.. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात योगा चा प्रचार प्रसार करून योगा चं महत्व समजावून देण्याचं काम केलं.कोरोनाच्या काळात खरी साथ आपल्याला योगा ने दिली,योगाच्या माध्यमातून आपलं शरीर सुदृढ बनविण्याचं काम अनेक संस्थांच्या माध्यमातून बाबा रामदेव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामपातळीपासून शहरा पर्यंत योग हा कसा महत्वाचा आहे हे पटवून देण्याचं काम केलं.असं म्हणून योगा प्राणायाम अंगिकरण्याचे आवाहन करून योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.