पुणे : हत्येसारखा गंभीर (Pune Yerwada Jail Restaurant) गुन्हा हातून घडलेल्या गुन्हेगाराला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्या गुन्हेगारांकडून पुढच्या आयुष्यात काही चांगलं घडेल याची सहसा कोणी अपेक्षा करत नाही. मात्र येरवडा कारागृहाने हा समाज खोटा ठरवला आहे. कारागृहाने विश्वास टाकलेल्या जन्मठेपेच्या शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडून सुरु करण्यात आलेल्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेल्या या हॉटेलला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. श्रृंखला उपहारगृह असं या हॉटेलचं नाव आहे.


येरवडा कारागृहाच्या जवळच असलेल्या कॉमर्स झोनमध्ये अनेक आयटी कंपन्यांची, फायनान्स रिलेटेड कंपन्यांची कार्यालयं आहेत. मात्र या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना जेवण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्यांवर चालवल्या जाणाऱ्या हॉटेलचा आधार घ्यावा लागतो. या ठिकाणी असलेली एका चांगल्या हॉटेलची गरज श्रुंखला या कैद्यांच्या उपहारगृहाने भरून काढली आहे. नुकत्याच सुरु झालेल्या या हॉटेलमध्ये ग्राहकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे. रुचकर पदार्थ आणि ते देखील अगदी माफक दरांमध्ये या हॉटेलमध्ये मिळतात. सोबत स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण, मोकळी हवा यामुळं हे हॉटेल सर्वांच्या नजरेत भरत आहे. मात्र  हे हॉटले चालवलं जाणाऱ्यांच्या हातांमध्ये या हॉटेलचं वेगळेपण दडलंय. साध्य़ा कोणत्याही हॉटेलसारखंच हे हॉटले आहे. पदार्थ देखील नेहमीचेच आहे. ज्यांना जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागत आहे, अशा बंदीजनांकडून हे हॉटेल चालवलं जातं आहे.


येरवडा कारागृहातील कैद्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून अनेक वस्तू आणि पदार्थ बनवून घेतले जातात आणि त्यांची विक्री केली जाते. पण अशाप्रकारे कैद्यांकडून हॉटेल चालवलं जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. ग्राहकांना या कैद्यांनी तयार केलेले पदार्थ आवडत आहेत. कैदी एवढं चांगलं जेवण तयार करताना पाहून कौतुकही वाटत आहे. 


अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर देखरेखीची जबाबदारी


कैद्यांकडून हे उपहारगृह चालवलं जाणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण वेगवगेळ्या प्रकारचे लोक इथं येत असतात. या उपहारगृहावर देखरेख करण्याचं काम अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली. येरवडा कारागृहाच्या ताब्यात कारागृहाची इमारत सोडून शेकडो एकर जमीन आहे. या जमिनीवर कैद्यांकडून शेती करून घेतली जाते. त्या शेतीत सेंद्रिय पद्धतीनं पिकवला जाणारा भाजीपाला या उपहारगृहात वापरला जात आहे. 


20 कैद्यांची हे उपहारगृह चालवण्यासाठी निवड


येरवडा कारागृहात कैद्यांसाठी ज्या किचनमध्ये स्वयंपाक बनवला जातो तिथं काम करणाऱ्या आणि ज्यांची वर्तणूक सुधारलीय अशा 20 कैद्यांची हे उपहारगृह चालवण्यासाठी निवड करण्यात आली आहे. कैद्यांवर दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरत असल्याचं कारागृहातील कारागृह महासंचालक स्वाती साठे यांनी म्हटलं आहे. या उपहारगृहातून मिळणारा नफा सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहे. मात्र त्यापेक्षा इथं येणाऱ्या ग्राहकांना भरपेट जेवणाचं मिळणारं समाधान मोठं आहे, असल्य़ाचं त्या म्हणाल्या.


इतर कारागृहात उभारणार उपहारगृह?



येरवडा कारागृहाकडून सुरु करण्यात आलेल्या या उपहारगृहाला मिळणारा प्रतिसाद पाहून राज्यातील इतरही कारागृहांच्या परिसरात अशीच उपहारगृहं सुरु करण्याचा कारागृह प्रशासनाचा विचार आहे. आयुष्याच्या एका बेसावध क्षणी हातून हिंसक कृत्य घडतं आणि गुन्हेगार हा शिक्का आयुष्यभरासाठी कपाळी येतो. असा शिक्का बसलेली व्यक्ती पूर्णपणे वाईट असते का? , टाकाऊ असते का ? या प्रश्नाचं उत्तर तुरुंग प्रशासन आणि या कैद्यांनी हे उपहारगृह चालवून दिलंय. ज्या हातांमधून नकळतपणे गुन्हा घडला त्याच हातांमधून रुचकर अन्न तयार होताना दिसत आहे.


इतर महत्वाची बातमी-


Pune News : स्वच्छतेचा नमो करंडक स्पर्धेचा न्यूयॉर्कमध्ये डंका; टाईम्स स्क्वेअरवर झळकले अनावरणाचे दृश्य