यवतमाळ : चित्रपटातील कथा शोभावी अशी घटना प्रत्यक्षात यवतमाळमध्ये समोर आली आहे. 40 वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या मायलेकीची पुन्हा भेट झाली. स्वीडनमध्ये राहणाऱ्या एलिझाबेथला अथक प्रयत्नांनंतर यवतमाळमध्ये राहणाऱ्या आईची भेट घडली.


आत्महत्याग्रस्त पित्याची अडीच वर्षांची मुलगी परिस्थितीमुळे स्वीडनला दत्तक गेली. वयाच्या 13-14 व्या वर्षांनंतर आपले खरे जन्मदाते कोण याचा शोध घेत राहिली. अखेर तिला 27 वर्षांनंतर मृत्यूच्या दारात असलेली आई गवसली.

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आई-मुलीची भेट झाली. थॅलिसीमिया या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या आईला आपली मुलगी स्वीडनहून आल्याचं समजले. भाषेच्या भिंती ओलांडून मायलेकीने स्पर्श आणि प्रेमाच्या बोलीने संवाद साधला आणि अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून 1973 साली विष घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची पत्नी माहेरी गेली तेव्हा ती गरोदर होती. तिने एका मुलीला जन्म दिला. ती मुलगी पुण्याच्या एका संस्थेत देण्यात आली. त्या संस्थेने तिला स्वीडनच्या एका दाम्पत्याला दत्तक दिलं.

या मुलीच्या आईने दुसरा विवाह केला. तिला दोन मुलं आणि एक मुलगी झाली. तिच्या दुसऱ्या पतीचेही निधन झाले. मोलमजुरी करुन तिची उपजीविका सुरु असताना ती आजारी होऊन मृत्यूच्या दारात उभी होती. अशावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेत वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करुन तिला जीवदान दिलं.

तिकडे स्वीडनमध्ये असलेल्या नीलाक्षी एलिझाबेथ या तिच्या मुलीला अरुण डोरे आणि अॅड. अंजली पवार यांच्या अथक प्रयत्नाने आईचा शोध लागला. आईच्या शोधात एलिझाबेथ आतापर्यत 6 वेळा भारतात येऊन गेली होती

ज्यावेळी एलिझाबेथ सहकाऱ्यांसह यवतमाळला पोहचली, तेव्हा तिच्या आईची प्रकृती खालावली होती. सामाजिक कार्यकर्ते आणि तिच्या आईसाठी मध्यरात्री रक्ताची व्यवस्था करुन तिचा जीव वाचवण्यात आला आणि या मायलेकीची भेट घालून दिली.

स्वीडनमध्ये तिला आलेला अनुभव काहीसा त्रासदायक होता. तिथे तिला रंगावरुन वेगळी वागणूक मिळाली. तिची स्वीडनमधील आई तिच्याशी कठोर वागत होती असंही ती सांगते.

ज्यावेळी नीलाक्षी एलिझाबेथ यवतमाळला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचली त्यावेळी आईशी गळाभेट झाली आणि दोघी हमसुन हमसुन रडल्या. नीलाक्षीदेखील आजारी असल्याने तिने स्वीडनमधील नोकरी सोडली आहे. स्वीडन सरकार तिच्या आरोग्याची काळजी घेत आहे. लवकरच ती स्वीडनमध्ये परत जाणार आहे. पुन्हा आईच्या भेटीसाठी ती भारतात येत राहणार आहे.