Yavatmal Washim Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) पडघम वाजायला सुरुवात होण्यास आता अवघा काहीच अवधी शिल्लक राहिला आहे. असे असताना महायुतीतील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित यवतमाळ-वाशिम(Yavatmal Washim)लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे महायुतीमध्ये या जागेवरून रस्सीखेच होताना दिसत आहे. अशातच या लोकसभा मतदारसंघातून आपल्यालाच उमेदवारी मिळणार असून यावेळी आपण विजयाचा षटकार मारू आणि विरोधकांना क्लीनबोल्ड करू, असा निर्धार शिवसेनेच्या विद्यामान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी केला आहे.
आपल्या उमेदवारी बद्दल कुठलीही चिंता नाही. पक्षातील वरिष्ठ आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे योग्यच निर्णय घेतील आणि मला विजयाचा षटकार मारण्यासाठी आशिर्वाद देतील, असा विश्वास देखील भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी बोलतांना व्यक्त केलाय. भावना गवळी आज तातडीने भर दुपारी मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत. त्यामुळे त्या मुंबईला कोणाची भेट घेतात आणि यवतमाळ-वाशिम (Yavatmal Washim) मतदारसंघावर कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
यवतमाळ वाशिम मतदारसंघावरील दाव्यावर पुनरुच्चार
महायुतीमध्ये यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी आपला दावा वेळोवेळी बोलून दाखवला आहे. तर याच जागेसाठी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना देखील उमेदवारी देण्याबाबत जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. त्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात नेमकी उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणे अधिक उत्सुकतेचे ठरणार आहे. साधारणतः एकाच आठवड्यात यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या मतदारसंघाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात भाजपचे धक्कातंत्र?
'मै मेरी झांशी नहीं दूंगी' या ऐतिहासिक घोषणेचा जयघोष करत खासदार भावना गवळी यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचा पुनरुच्चार वारंवार केला आहे. असे असताना भाजपने महाराष्ट्रातील पहिल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर करून पाच लोकसभा मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर केलाय. भाजपचे हे धक्कातंत्र अजून संपले नसून विदर्भात आणखी 4 लोकसभा मतदारसंघात असेच धक्कातंत्र देण्याच्या तयारीत केंद्रीय नेतृत्व असल्याची माहिती आहे. त्यामध्ये यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात संजय राठोड यांना महायुतीच्या माध्यमातून लोकसभेचा उमेदवार जाहीर केला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या तिहेरी लढतीत ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या