Yavatmal News Update : एखाद्या महिन्यातील 10 दिवसांपूर्वीच्या तारखेचा वार विचारला तर आपल्याला वार्षिक कॅलंडर चाळावे लागते. मात्र, यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथील एका 14 वर्षीय मुलीने वेगळीच किमया साधली आहे. तिला 10  हजार वर्षातील कोणतीही तारीख सांगा, ती न चुकता पाच सेकंदात त्या तारखेचा वार सांगते. म्हणून तर तिच्या या कलेला चमत्कार म्हणायचं की भन्नाट बुद्धी असा प्रश्न सर्वांचं पडला आहे. तिच्या या कलेचं सर्वत्र कौतुक होत असून  या विक्रमाची दखल ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून तिच्या नावाची रेकॉर्ड बुकमध्ये नोंद केली. 


पांढरकवडा येथील लक्ष्मी पंकज चिंतावार ही गुरुकुल शाळेत आठवीमध्ये शिकत असून ती अभ्यासात हुशार आहे. तिला गणित या विषयाची फार आवड आहे. गणितात काही तरी विशेष करावं आणि आई वडिलांचं नाव मोठं करावं अशी लक्ष्मीची सुरुवाती पासूनच इच्छा होती. त्यामुळे ती या विषयाबाबत युट्युबवरील वेगवेगळे प्रयोग पाहत होती. त्यासाठी ती आईची मदत घ्यायची. 


सचिन कुमार नावाची एक व्यक्ती दिवसाचे गणित करून वार कसा शोधत आहे. हे लक्ष्मीच्या आईच्या लक्षात आले. त्यांनी लक्ष्मीला याबाबत महिती दिली. काही दिवसात तिला यात गोडी निर्माण झाली. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्याने लक्ष्मीने हा विषय हाती घेतला. त्यासाठी तिने काही वर्षातील तारखेचा अभ्यास केला आणि पाहतात पाहता ती तारीख सांगितली की वार सांगायला लागली. आता तीला 10  हजार वर्षातील कोणतीही तारीख सांगितली तर ती न चुकता  त्या दिवसाचा वार अवघ्या पाच सेकंदात सांगते.  


लक्ष्मी ही पांढरकवडा या छोट्याशा तालुक्याच्या ठिकाणच्या गुरुकुल शाळेत शिक्षण घेत आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व शाळा बंद होत्या. या काळात बऱ्याच मुलांना मोबाईलचा लळा लागला. त्यातील काहींनी मोबाईलचा चांगला उपयोग करून घेतला. त्यातलीच लक्ष्मी एक आहे. लक्ष्मीने युट्युबवरून या प्रयोगाला सुरुवात केली. त्यात तिला आवड निर्माण झाली. ती एवढ्यावरच थांबली नाही तर तिने विक्रमाच्या दिशेने वाटचाल केली. ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिच्या नावाची नोंद झाली. लक्ष्मीच्या या यशाने तिचे शिक्षक देखील भारावून गेले आहेत.


लक्ष्मी लहानपानापासूनच अतीशय हुशार आहे. सुरुवातीला प्रयत्न कमी पडले. मात्र, आमचे एकत्र कुटुंब असल्याने सर्वांचे सहकार्य मिळाले. ओएमजी रेकॉर्ड मध्येही तिची नोंद घेण्यात आली. लक्ष्मी 10 हजार वर्षातील कोणत्याही तारखेचा वार  अवघ्या पाच सेकंदात सांगते. हे सगळं असाधारण आहे, असे  तिच्या कुटुंबातील सदस्य सांगतात.