यवतमाळ : जिल्ह्यात दरवर्षी वन्यजीवांकडून शेतीपिकांचं मोठं नुकसान होतं. कधी वन्यप्राण्यांकडून झालेल्या हल्ल्यात मनुष्यहानी होते तर कधी शेतकऱ्यांच्या पशुधनावर वन्यप्राणी हल्ले करतात. त्यामुळे पशुधनाचं सुध्दा मोठं नुकसान होतं. झालेलं नुकसान भरून काढणं कठीण असतं. वन विभाकडून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी काही प्रमाणात आर्थिक मदत दिली जाते. मात्र शासनाकडून गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेली 17 कोटी रुपयांची ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही.
वन विभागाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम साधारण एका संबंधित व्यक्ती किंवा शेतकरी पशुपालक किंवा त्याच्या नातलगांना देणं अपेक्षित आहे. मात्र आज हजारो हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालं असतानाही त्याच्या नुकसान भरपाईची रक्कम मागील दीड वर्षीत शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत .
सन 2020 मध्ये ही रक्कम साधारण 12 कोटी 65 लाख तर जानेवारी ते जून 2021 पर्यंत साधारणपणे 5 कोटी रुपये विविध प्रकरणात येणे अपेक्षित आहेत. साधारण दीड वर्षात 17 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे केली आहे, मात्र ती रक्कम आजही प्रलंबित आहे.
शासनाकडून ती प्रलंबित रक्कम प्राप्त झाल्यानंतर हे तात्काळ शेतकऱ्यांना आणि संबंधित व्यक्ती यांना ती रक्कम देण्यात येईल असे यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर यांनी सांगतले आहे .
यवतमाळ आणि वाशिम वनवृत्तमध्ये वन्यप्राण्यांच्याकडून जे नुकसान झाले त्याची आकडेवारी खालीलप्रमाणे,
सन 2020 मध्ये मनुष्यहानी 2 प्रकरण असून त्याचे 30 लक्ष प्रलंबित आहेत तर वन्यप्राणी यांच्या कडून झालेल्या हल्ल्यात मनुष्यजखमी झाल्याचे 75 प्रकरण आहे, ज्यात 49 लाख 80 हजार रुपये प्रलंबित रक्कम आहेत .तर पीक पीकहानी मध्ये 32918 प्रकरणात 11 कोटी 66 लाख रुपये प्रलंबित आहेत. तसेच पशुधनहानी 466 प्रकरणात 78 लक्ष 83 हजार रुपये प्रलंबित आहेत अशा प्रकारे 12 कोटी 65 लक्ष रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.
जानेवारी 2021 ते जून 2021 पर्यंत मनुष्य जखमीचे 33 प्रकरणं मध्ये 13 लाख 18 हजार तर पीक हानी चे 14 हजार 857 प्रकरणं मध्ये 4 कोटी 24 लाख 71 हजार रुपये प्रलंबित आहेत तर पशुधन हानीचे 112 प्रकरण 16 लाख 39 हजार रुपये प्रलंबित आहेत. असे या वर्षाचे मिळून साधारण 5 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम संबंधित व्यक्ती, शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत मिळणे अपेक्षित आहे. मात्र दीड वर्ष झाले तरी ती रक्कम संबंधित व्यक्तीना मिळाली नाही त्यांना आजही त्याची वाट पाहावी लागतेय
यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील शेतकरी मनीष जाधव यांच्या शेतात सन 2020 च्या रब्बी हंगामात त्यांनी गहू पिकांची लागवड केली. मात्र रोही आणि रानडुक्करच्या कळपाने त्याच्या गहू पिकांचे मोठं नुकसान केले. नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्यांनी वन विभाग पुसद येथे अर्ज केला, चकरा मारून ते थकले मात्र त्यांना वर्ष झाला तरी झालेल्या नुकसानची भरपाई ची रक्कम अजून मिळाली नाही.
महागाव तालुक्यातील पिंपळगाव येथिल शेतकरी जयसिंग राठोड यांच्या शेतात मागील वर्षी वन्य प्राण्याकडून तूर ,कापूस या पिकाच नुकसान झाले त्यानंतर त्यांनी जून 2020 मध्ये वन विभागाकडे नुकसान भरपाई बाबत अर्ज केला होता मात्र त्याची रक्कम अजून त्यांना मिळाली नाही.
दीड वर्षात साधारण 17 कोटी रुपयांचा नुकसान भरपाईची रक्कम वन विभागाकडे प्रलंबित आहे. ती रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळते याचीच आता सर्वाना प्रतीक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या :