यवतमाळ: दारु विक्रीसाठी एका विक्रेत्याने अनोखी शक्कल लढवून तांत्रिक बाबीचा वापर करत देवाच्या देव्हाऱ्याखालीच दारुच्या टाक्या बांधल्या. पोलिसांची नजर चुकविण्यासाठी चक्क देव्हाऱ्याखालीच भूमिगत टाक्या करून त्याची दारू तस्करी सुरु होती. अखेर या अट्टल दारु विक्रेत्याचा यवतमाळ ग्रामीण पोलीसांनी भांडाफोड केला आहे .

सचिन इंगळे असे या दारू विक्रेत्याचे नाव आहे. यवतमाळच्या जाम वाकडी येथील सचिनने पोलिसांची नजर चुकविण्यासाठी चक्क देव्हाऱ्याखालीच जमिनीखाली तीन फूट खोल भूमिगत टाक्या केल्या होत्या. त्यात एक ड्रम ठेवून कुलरमधील पाण्याच्या मोटारीचा वापर करीत त्याने अवैध दारू विक्रीला तांत्रिकतेची जोड दिली होती. एका बटनाद्वारे ती मशीन सुरु करुन ग्राहकांना तो दारू पुरवायचा. त्याची ही शक्कल बघून पोलिसही चक्रावून गेले आहेत.

जिथे त्याचा दारूसाठा होताय त्या देव्हाऱ्याखाली 3 फूट खोल खड्डा केला होता. त्यात एक प्लास्टिक टाके होते. त्यात मोटार टाकली होती. या ठिकाणाहून दुर्गंधी येऊ नये म्हणून  त्या ठिकाणी पोत्यांनी व्यवस्थित झाकून ठेवले होते आणि त्यावर विटा टाकल्या होत्या. ग्राहकाचे दारूचे ग्लास तो धुवून ठेवायचा त्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता.

कोणालाही संशय येऊ नये म्हणून दारूविक्री करणाऱ्याने देवघराच्या खाली एक दारू जमा करण्याकरिता मोठा पिंप गाडला होता. दारू काढण्यासाठी वारंवार देव उचलायची गरज लागू नये आणि कोणत्याही व्यक्तीला संशय येऊ नये यासाठी त्याने कुलरमध्ये वापरल्या जाण्याऱ्या मोटरपंपचा उपयोग केला. त्याला इलेक्ट्रिकचा सप्लायही दिला. गरजेपुरती दारू हवी असल्यास एकदा बटन दाबले की सोय व्हायची.

शिवाय अवैध दारू देवघराच्या खाली असलेल्या पिंपात ओतायची असेल तर त्यासाठी देखील वेगळा खास पाईप दिला होता. पोलिसांनी त्याच्या घरी कित्येक वेळी धाडीही टाकल्या पण त्यांना रिकाम्या हाती परत यावे लागत होते.  पण यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देवघराखाली तपासणी केली असता त्याचे पितळ उघडे पडले. सचिन इंगळे  सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.