यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यामध्ये कळंब हे विदर्भातील अष्टविनायक आहे. याच श्री चिंतामणी मंदिराच्या परिसरात असलेल्या कुंडाच्या आजूबाजूच्या भागातून गंगा अवतरली असल्याची चर्चा झाल्यानं रात्रीपासून भक्तांची गर्दी श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी झाली आहे. विषयावर भूगर्भ शास्त्रज्ञ सौरभ मोटघरे यवतमाळ शास्त्रज्ञ यांनी आज कळंब चिंतामणी परिसरात पथकासह दाखल झाले. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी साठा वाढला म्हणून या भागात पाणी आले आहे, अशी प्राथमिक माहिती शास्स्त्रज्ञ सौरभ मोटघरे यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
कळंबमध्ये श्री चिंतामणी प्राचीन मंदिर आहे. खुद्द भगवान इंद्रानेच या चिंतामणीची स्थापना केली असल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे येथे नेहमी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते. याच ठिकाणी काल सायंकाळी गंगा अवतरली असल्याची चर्चा सुरु झाली. 1995 नंतर 26 वर्षांनंतर मंदिरात गंगा अवतरली असल्याची चर्चा झाल्याने अनेक भागातून भक्त इथं येत आहेत. चक्रावती नदीकाठी असलेले पवित्र श्रद्धास्थान कळंबचे ग्रामदैवत आहे. विशेष म्हणजे येथील चिंतामणी विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असून येथील चिंतामणी भक्तांच्या चिंता दूर करतो अशी अख्यायिका आहे.
यवतमाळ -नागपूर महामार्गावर कळंब हे तालुक्याचे ठिकाण आहे. यवतमाळपासून पूर्वेला साधारण 22 किलोमीटर अंतरावर चिंतामणी गणेशाचे हे मंदिर आहे.चिंतामणीचे मंदिर जमिनीखाली 33 फूट खोल असून मंदिराची बांधणी साधी आणि सुबक आहे. मंदिरातील सभा मंडपात प्रवेश करताच येथे चार मुखाची श्री गणेशची मूर्ती दिसते. एकाच दगडात चारही बाजूंना चार गणेश मुर्ती कोरल्या आहेत. दक्षिणमुखी या मंदिरात पोहचण्यासाठी तीन मार्ग आहेत. येथील मंदिराच्या 29 पायऱ्या खाली उतरुन गेल्यानंतर एक अष्टकोनी कुंड आहे आणि त्याच समोर भगवान श्री चिंतामणीची पवित्र आणि प्राचीन मूर्ती आहे.
येथील अष्टकोनी कुंडाला जिवंत झरे असून त्याला पावन तीर्थ समजले जाते आणि त्याच्या अगदी समोरच्या गाभाऱ्यात मुख्य चिंतामणीची मूर्ती आहे. जमिनीवर खाली गणेश मंदिरात येण्यासाठी पायऱ्यांचे 3 मार्ग आहेत. मंदिराच्या चारही बाजूंना मजबूत दगडाच्या भिंती आहेत . मंदिर जमीनीखाली असून सुद्धा ते हवेशीर आहे. येथे प्रवेश करताच भक्तांना प्रसन्न वाटते. येथे असलेल्या अष्टकोनी कुंडाच्या परिसरात काल सायंकाळी या भागांतून गंगा अवतरली असा दावा मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष चंदू चांदोरे यांनी केला.
काय आहे अख्यायिका
एकदा ब्रह्मदेवाने एक लावण्यवती स्त्री निर्माण केली. तिला आपली मुलगी मानले. त्यांनी या मुलीचे नाव अहिल्या ठेवले. अहिल्येच्या विवाहासाठी ब्रह्मदेवाने पण जाहीर केला. त्यानुसार ब्रह्मदेवाने महर्षी गौतम यांना आपली कन्या प्रदान केली. मात्र अहिल्येच्या लावण्याने इंद्र घायाळ झाला होता. त्यामुळे इंद्राने गौतमाचा वेष धारण करून अहिल्येशी दुराचार केला. महर्षी गौतम यांना हे कळताच त्यांनी इंद्राला शाप दिला होता त्यावेळी इंद्राने महर्षी गौतम यांची क्षमा मागितल्यावर गौतम ऋषींनी इंद्रास विदर्भात कळंब येथे जावून श्री चिंतामणीची तपश्चर्या करण्यास सांगितले. इंद्राच्या तपश्चर्येने श्री गणेश प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या अंकुशाने एक कुंड निर्माण केले. या कुंडातील पाण्याने स्नान करून इंद्राचा रोग नाहीसा झाला. तेव्हापासून या पाण्याने पापक्षालन होते असे मानले जाते. स्नान झाल्यावर इंद्राने तेथेच गणेशाची स्थापना केली आणि गणेश अभिषेकासाठी स्वर्गातून गंगेला पाचारण केले आणि तिला आदेश दिला की दर 12 वर्षांनी तिने पृथ्वीवर येवून श्री गणेशाच्या पायाला स्पर्ष करून जावे. तेव्हापासून दर 12 ते 13 वर्षा पासून कळंबच्या मंदिरातील कुंडातून गंगा वर येते आणि देवाच्या चरणांना स्पर्ष करून निघून जाते, असे येथे सांगितले जाते. विशेष म्हणजे भगवान इंद्राने श्री चिंतामणीच्या मूर्तीची स्थापना कदंब वृक्षाखाली केली असल्याने या गावाला कदंबवरून कळंब असे नाव पडले.
काय म्हणाले भूगर्भ शास्त्रज्ञ
चिंतामणी कळंब गंगा अवतरल्याचं कळताच भूगर्भ शास्त्रज्ञ सौरभ मोटघरे यवतमाळच्या कळंबमध्ये पोहोचले. मोटघरे आज कळंब चिंतामणी परिसरात पथकासह दाखल झाले. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे भूगर्भातील पाणी साठा वाढला म्हणून या भागात पाणी आले अशी प्राथमिक माहिती सौरभ मोटघरे यांनी दिली. दर्शनासाठी गर्दी वाढल्यानंतर रात्री गर्दी केली होती तसेच येथे पोलिसांची मदत घेतली जात आहे अतिरिक्त कुमक येथे बोलावली आहे. भाविकांनी मास्क लावून दर्शन घ्यावे असे भाविकांना आवाहन प्रशासनाने केलं आहे.