Amravati Akola Road Update : अमरावतीवरुन अकोला जायचं म्हटलं की कंबरेची हाडं मोडतील इतकी भीती प्रवाश्यांना या राष्ट्रीय महामार्गावर जाण्याची वाटते. अमरावती ते अकोला हा मार्ग इतका खराब झाला की प्रवाशी अक्षरशः कंटाळले होते. पण आता केवळ पाच दिवसात या मार्गावर तुम्ही स्केटिंग स्पर्धा घेऊ शकाल असं म्हटलं तर तुम्हाला अजिबात विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रस्ता निर्मितीचा एक ऐतिहासिक, जागतिक विक्रम होणार आहे. काँक्रिटीकरणासह, जगातील सर्वात लांब आणि अखंड अमरावती ते अकोला रस्ता निर्मितीची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद होण्यासाठी अमरावतीमध्ये प्रक्रिया सुरू झाली आली आहे.
सर्वात लांब रस्ता निर्मितीचे काम 728 मनुष्यबळ
अमरावती ते अकोला या दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर अमरावतीच्या लोणी ते अकोल्याच्या मुर्तीजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील चौपदरीकरणाचे काम, 3 ते 7 जून दरम्यान करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील, अमरावती ते अकोला जिल्हयातील, चौपदरीकरणाच्या कामाला गती येण्याच्या दृष्टीने 3 जूनला सकाळी 6 वाजतापासून ते 7 जूनच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत ‘बिटुमिनस काँक्रिट’च्या जगातील सर्वात लांब रस्ता निर्मितीचे काम 728 मनुष्यबळ करणार आहे.
राजपथ इन्फ्राकॉनचा धाडसी प्रयत्न
हा प्रयोग यशस्वी झाल्यास, त्याची नोंद 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये होईल. राजपथ इन्फ्राकॉनचा हा धाडसी प्रयत्न गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या संपूर्ण नियमानुसार होणार आहे. तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया (NHAI) द्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत पूर्ण केला जाईल.
अमरावती ते अकोला मार्गाची सध्याची दुरावस्था पाहता हा निर्णय खूप महत्वाचा ठरणार आहे. हा एक अनोखा प्रयोग या निमित्तानं समोर येत आहे. अशा पद्धतीनं विक्रमी वेळात काम शक्य झाल्यास वेगाने रस्ते निर्मिती शक्य होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Konkan Railway : पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज; वेळापत्रकातही बदल
पुणतांबा शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस; आंदोलन सुरु असतानाच नाशिकमध्ये कांदा परिषदेची घोषणा