बुलडाणा : चीनमध्ये नुकतीच जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतातील अनेक पोलीस सहभागी झाले होते. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेली महिला पोलीस कॉन्स्टेबल मोनाली जाधवदेखील सहभागी झाली होती. मोनालीने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे. 'टार्गेट आर्चरी'मध्ये मोनालीने 720 पैकी 716 गुण मिळवत दोन सुवर्ण पदकं आणि एक कांस्यपदक जिंकले आहे.
मोनाली जाधव ही 2013 मध्ये पोलीस दलात भरती झाली असून बुलडाण्यामधील आनंद नगर येथील राहवासी आहे. सध्या ती जलंब पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. चीनच्या चेंगडू येथे 8 ते 18 ऑगस्टदरम्यान जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा झाल्या. यामध्ये मोनालीने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. मोनालीने फिर्ल्ड आर्चरीमध्ये सुवर्ण, तर 'थ्रीडी' आर्चरी प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे.
मोनालीने मे महिन्यात शांघाय येथे झालेल्या विश्व स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत जागतिक स्तरावर नववे स्थान मिळवले होते. मोनाली जाधवला तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग, सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन तसेच पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन मिळाले.
बुलडाणासारख्या साधारण शहरात आणि गरीब कुटुंबात राहणारी मोनाली बारावी असताना तिच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. घरातील कमावता पुरुष गेल्याने सर्व जबादारी तिच्या आईवर आली. आईला मदत व्हावी आणि मोनालीचे शिक्षण पूर्ण व्हावे, यासाठी मोनालीच्या मोठ्या भावाने त्याचे शिक्षण बंद करुन मजुरी करायला सुरुवात केली. आई आणि भाऊ मजुरी करुन घरचा प्रपंच चालवत होते, हे पाहत असताना कुटुंबासाठी आपणही मदत करावी अशी भावना मोनालीच्या मनात येत होती. त्याचवेळी महाराष्ट्र पोलीस दलात भरती सुरु झाली. खेळाची लहानपणापासूनच आवड असल्याने मोनालीने पोलीस भरती प्रक्रिया यशस्वीरित्या पास करुन ती बुलडाणा पोलीस शिपाई म्हणून भरती झाली.
सैन्यदलातून निवृत्त होऊन मोनालीच्या बॅचमध्ये महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती झालेले चंद्रकांत टिळक यांनी मोनालीची खिलाडूवृत्ती पाहून तिला तिरंदाजीबद्दल मार्गदर्शन केले. ते ऐकून मोनालीलाही तिरंदाजीबद्दल आवड निर्माण झाली. प्रशिक्षक चंद्रकांत टिळक यांच्या मार्गदर्शनात तिने खेळायला सुरुवात केली. त्यानंतर ती या खेळात निपुण झाली. आतापर्यंत तिरंदाजीच्या अनेक स्पर्धा मोनालीने गाजवल्या आहेत.
जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा : बुलडाण्याच्या मोनाली जाधवला दोन सुवर्णांसह तीन पदकं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Aug 2019 06:26 PM (IST)
चीनमध्ये झालेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत महिला कॉन्स्टेबल मोनाली हर्षचंद्र जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -