नाशिक : महात्मा गांधी यांच्या हत्याप्रकरणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वाचवण्यात आलं, असं खळबळजनक वक्तव्य महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये त्यांनी असं वक्तव्य केलं.


नाशिकच्या परशुराम सायखेडकर सभागृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत 'महात्मा गांधी से गौरी लंकेश तक, राजकीय हत्याओ का सनातन सत्य' या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधींच्या हत्येत जी प्रणाली वापरण्यात आली, तशीच डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या वेळीही वापरली गेली.


नथुराम गोडसे बुरखा घालून बापूंना गोळ्या घालणार होता. मात्र दोन वेळा बुरखा घातला असल्याने त्याला नीट चालता आलं नाही आणि बंदूक ठेवायला खिसाही नव्हता, असा दावा तुषार गांधींनी केला. दाभोळकर बनायचं आहे का? मॉर्निंग वॉकला जाता का? अशा धमक्या सध्या अनेकांना दिल्या जात आहेत. अनेक वेळा मलाही हे विचारण्यात आलं की मॉर्निंग वॉकला जातात का? असं तुषार गांधींनी सांगितलं.



महात्मा गांधींच्या हत्येचा तपास नीट झाला नाही. त्यामुळे त्याचा तपास परत करण्यात यावा अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्याची माहिती तुषार गांधी यांनी दिली. भारत-पकिस्तानची फाळणी झाली, त्यावेळी महात्मा गांधींना विचारलंही नव्हतं. महात्मा गांधींचा फक्त बळी दिला गेला, असंही तुषार गांधी म्हणाले. नथुरामला हत्यार देणाऱ्यांना का सोडलं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपल्या स्वार्थासाठी त्यांना महात्मा ही उपाधी दिली गेली, असा दावाही त्यांनी केला.


नथुराम गोडसे काही विचारांचा बळी ठरला होता. त्याचा बचाव केला गेला नाही, मात्र सावरकरांचा बचाव करण्यात आला. महात्मा गांधींच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीत सर्व कायदेशीर युक्तीवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी फक्त सावरकरांना वाचवण्यासाठी वापरले. बाकी नथुराम आणि इतर कुणालाच वाचवलं गेलं नाही, असंही ते म्हणाले.


महात्मा गांधीच्या हत्येच्या कटात सावरकरांचा सहभागाविषयी कपूर कमिशनच्या अहवालात नोंद आहे. गांधींच्या हत्येचा तपास नीट झाला नसून त्याचा तपास परत करण्यात यावा, अशी याचिका गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टात दाखल झाल्याची माहिती तुषार गांधींनी दिली.