जालना : इटलीतील व्हेरोना शहरात एक ते 10 एप्रिल या कालावधीत तलवारबाजीच्या जागतिक विजेतेपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून 14 मुलींची निवड झाली असून, त्यात जालन्याच्या संस्कृती पडुळचा समावेश आहे. या स्पर्धेत संस्कृती पडुळकडून जालनावासियांसह तमाम महाराष्ट्रालाही मोठ्या अपेक्षा आहेत.
जालन्याच्या संस्कृती पडुळची तळपती तलवार आता भारताला जग जिंकून देण्याच्या इराद्यानं रणांगणात दाखल होणार आहे. हे रणांगण आहे तलवारबाजीच्या जागतिक विजेतेपद स्पर्धेचं. इटलीतल्या व्हेरोना शहरात एक एप्रिलपासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
तलवारबाजी या खेळात फॉईल, इप्पी आणि सेबर या तीन प्रकारांचा समावेश असतो. तलवारबाजीच्या जागतिक विजेतेपद स्पर्धेतल्या सेबर प्रकारासाठी देशभरातून दोन महिला खेळाडूंची निवड झाली आहे. त्यात संस्कृतीचा समावेश आहे. संस्कृतीनं आजवर विभागीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर 35 पेक्षा अधिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यात तिने 15 पदकांची कमाई केली आहे.
संस्कृतीला पाचवी इयत्तेत असल्यापासून तलवारबाजीची आवड निर्माण झाली. त्या वयात विभागीय पातळीपासून तिने आज जागतिक विजेतेपद स्पर्धेत खेळेपर्यंत मजल मारली आहे.
जालना शहरात सरस्वती भुवन शाळेच्या मैदानावर मुलींसाठी तलवारबाजीच्या प्रशिक्षणाची सोय आहे. पण शहरात सुविधांची वानवा असल्यानं संस्कृतीसारख्या खेळाडू मोठ्या संख्येनं तयार होत नाहीत. त्याचं शल्य प्रशिक्षकांच्या मनात आहे.
जालनासारख्या छोट्या जिल्ह्यात तलवारबाजीच्या सुविधांची उणीव असूनही संस्कृतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. पण जालन्यातल्या तलवारबाजी खेळाला सोन्याचे दिवस यावेसे वाटत असतील, तर संस्कृतीलाच इटलीतल्या जागतिक विजेतेपद स्पर्धेत लक्षवेधक कामगिरी बजावावी लागेल.