मुंबई: आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत. हे खरं असलं तरी पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी. या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


'मातोश्री' समोर राणा दाम्पत्यांचं हनुमान चालिसा पठण
उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' समोर आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे हनुमान चालिसा पठण करणार आहेत. आज सकाळी नऊ वाजता ते मातोश्री समोर येणार आहेत. त्यामुळे मातोश्रीजवळ शिवसैनिकांनी एकच गर्दी केली असून या परिसरात तणावग्रस्त वातावरण आहे. मातोश्रीसमोर शिवसैनिकांची गर्दी वाढली आहे. 


राणा दाम्पत्यांनी या ठिकाणी येऊ नये, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते असं पोलिसांनी सांगितलं आहे. तर राणा दाम्पत्य आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आज काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 


मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, त्याच्या प्रतिक्रिया
भाजप नेते मोहित कंबोज 'मातोश्री' बाहेरुन जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. मोहित कंबोज हे 'मातोश्री' बाहेर उभे राहून रेकी करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. या हल्ल्यानंतर मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था राहिली नसल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. शुक्रवारी रात्री साड नऊ वाजता मोहित कंबोज हे कलानगर परिसरातून जात होते. मोहित कंबोज यांची गाडी दिसल्यानंतर शिवसैनिकांनी त्यावर हल्ला केला. शिवसैनिकांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. या प्रकरणी आपण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देणार असल्याची माहिती मोहित कंबोज यांनी दिली आहे. 


कोल्हापूरात राष्ट्रवादीचा मेळावा


राष्ट्रवादी काँग्रेसचा आज कोल्हापूरमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. 


देशभरातील 1500 मौलवी आज प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला-
धार्मिक तेढ वाढवणारी तसेच सामाजिक शांतता भंग करणारी परिस्थिती निर्माण होत असल्याने देशातील जवळपास 1500 मुस्लिम मौलवी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. तसेच पैगंबर बिल संदर्भात देखील चर्चा करणार आहेत.
स्थळ - अजमेरी मस्जिद हॉल, अनीस कंपाउंड, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, साकीनाका,
वेळ - रात्री 10 वाजता


अमित शाह यांचा बिहार दौरा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज बिहार दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेणार नसल्याने त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. जातीय जनगणना तसेच विशेष राज्याचा दर्जा आणि इतर काही मुद्द्यांवरुन भाजप आणि नितीश कुमार यांच्यामध्ये मतभेद आहेत. त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा असल्याचं सांगण्यात येतंय. 


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची सार्वजनिक बँकांसोबत बैठक
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सार्वजनिक बँकांच्या प्रमुखांसोबत एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या वर्षीचा अर्थसंकल्प मांडल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे. 


आज दोन सामने
आजचा पहिला सामना गुजरात-कोलकाता दुपारी साडे तीन वाजता, तर दुसरा बंगळुरु-हैदराबादमध्ये संध्याकाळी साडे सात वाजता आहे.