सांगली : प्रसुती झालेल्या नवजात बाळासह एका महिलेला नाईलाजास्तव शासकीय रुग्णालयात चक्क जमिनीवर झोपावं लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गर्भवती रुग्णांची संख्या अधिक असल्याने बेड उपलब्ध होऊ शकला नाही, त्यामधून हा प्रकार घडल्याचं स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाने दिलं आहे.


मिरज शहरातील सोनाली गाडे ही महिला प्रसुतीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. तिची प्रसुती होऊन बाळ जन्माला आलं. यानंतर त्या महिलेला रुग्णालयात बेड उपलब्ध होऊ न शकल्याने नवजात बाळासह जमिनीवर झोपावं लागलं. यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला हा संतापजनक प्रकार निदर्शनास आणून दिला.

"रुग्णालयात दररोज प्रसुतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. मात्र बाळंतिणींसाठी राखीव असणारे बेड आणि जागा कमी पडत असल्याने हा प्रकार घडला आहे. रुग्णालयात अधिक बेड वाढवून देण्याची मागणी शासन दरबारी करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून तो मंजूर झाल्यास रुग्णांना अधिक सुविधा देणं शक्य होईल," असं स्पष्टीकरण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. धुमाळ यांनी दिलं आहे.

नुकतंच एका महिलेला ग्रामीण रुग्णालयात नकार मिळाल्याने तिची एसटी शेडमध्ये प्रसुती झाली होती. तर हेळसांड झाल्याने गरोदर महिलेचा बाळासह मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता मिरज शासकीय रुग्णालयात प्रसुती झालेल्या महिलेला नवजात बाळासह जमिनीवर झोपावं लागलं. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेचा अनोगोंदी कारभार आणि रुग्णालयातील सोयीचा तुडवडा हे विषय पुन्हा एकदा समोर आले आहेत.