सोलापूर : आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरला सोलापुरातून श्रमिक विशेष रेल्वे रवाना झाली. यावेळी एका महिलेला स्टेशनवर पोहोचायला उशीर झाल्याने तिने थेट रूळावरून धावतच स्टेशन गाठलं. गाडी सुटण्यासाठी अवघे काही मिनिटं शिल्लक असताना ही महिला पळताना पाहुन प्रशासनाने ही दिलदारपणा दाखवला. अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांनी तात्काळ दखल घेत महिलेची विचारपूस केली. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देऊन औपचारिकता तात्काळ पूर्ण करण्यास सांगितले. कागदपत्रे तपासणी, थर्मल स्कॅनिंग आणि इतर औपचारिकता पूर्ण करून या महिलेस जागा उपलब्ध करून देण्यात आली.


आपल्या दीड महिन्याच्या चिमुकल्या मुलीला घेऊन भर उन्हात या महिलेला पळताना पाहून वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या एका पत्रकाराने महिलेस तात्काळ मदत केली. सोलापुरातील पत्रकार यशवंत सादुल यांनी महिलेला पळताना पाहून महिलेच्या हातातून तान्हुल्या मुलीस आपल्या कुशीत घेतलं आणि रेल्वेच्या कोचपर्यंत पोहोचवलं. सृष्टी अखिलेश प्रजापती असं या चिमुकलीचे नाव आहे.


Maharashtra Lockdown 4.0 | महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊन कायम, राज्य सरकारचा निर्णय


रेल्वे 1146 नागरिकांना घेऊन रवाना
आज सोलापुरातून ग्वाल्हेरला निघालेल्या गाडीत 1314 लोकांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात 1146 नागरिक उपस्थित राहिले. त्यांना घेऊन गाडी ग्वाल्हेरला रवाना झाली. राज्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी, पर्य़टक इत्यादी परराज्यातील नागरिकांना घेऊन श्रमिक विशेष रेल्वे धावत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आणि आसपासच्या परिसरात ग्वाल्हेर येथील नागरिकांना घेऊन आज विशेष रेल्वे धावणार आहे. प्रशासन, रेल्वे विभाग, पोलीस यंत्रणामार्फत उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली होती. प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांची वैद्यकीय चाचणी आधीच करण्यात आली होती. रेल्वे स्थानक परिसरात दाखल होताच या नागरिकांचे पुन्हा एकदा थर्मल स्क्रीनिंग केले जात आहे. रेल्वेचे अधिकारी कर्मचारी देखील नागरिकांना त्यांच्या कोच पर्यंत पोहोचवलं. सोलापुरातील उद्योजक देखील या कार्यात सामाजिक बांधिलकी जपताना दिसले. प्रवास करणाऱ्या सर्व लोकांना लक्ष्मी हायड्रोलिक्स, स्पेन्का वॉटर यांच्यामार्फत नाष्टा, जेवण, पाणी यांची व्यवस्था करण्यात आली होती. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून अडकलेल्या या नागरिकांनी घरी परतताना समाधान होत असल्याची भावना व्यक्त केली.


नागपुरात अवघ्या एका पुरीसाठी मजुराची हत्या


सोलापूर जिल्ह्यात अद्याप काही परप्रांतीय नागरिक अडकून
या आधी सोलापूर विभागातील पंढरपूर आणि कुर्डूवाडी रेल्वे स्थानकातून दोन रेल्वे रवाना झाल्या आहेत. पंढरपुरातून 9 मे रोजी 981 प्रवाशांना घेऊन रेल्वे तामिळनाडू येथे रवाना झाली होती. त्यानंतर 14 मे रोजी कुर्डूवाडी स्थानकावरुन लखनऊ साठी विशेष रेल्वे रवाना झाली होती. जवळपास 1236 प्रवाशांनी कुर्डवाडी ते लखनऊचा प्रवास केला. सोलापूर जिल्ह्यात अद्याप ही काही परप्रांतीय नागरिक अडकून आहेत. संबधित नागरिकांसाठी त्या राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला आहे. मात्र, अद्याप संबंधित राज्यांकडून संमती प्राप्त झालेली नाहीये. लखनऊ, पटना, हावडा, रांची इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी सोलापुरातून प्रस्ताव सादर करण्.यात आलेला आहे. जवळपास 8 हजार 98 लोकांना सोलापुरातून सोडण्यासाठी प्रशासन करत आहे. त्यातील 1146 नागरिकांना ग्वाल्हेरला घेऊन विशेष रेल्वे आज रवाना झाली.


Solapur | सोलापूर स्थानकावर परप्रांतीय महिला प्रवाशासाठी ट्रेन थांबली, दीड महिन्याच्या बाळाला घेऊन महिलेची धाव