Maharashtra Corona Update : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी राज्यात 27,971 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी यामध्ये आणखी घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 22 हजार 444 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 39,015 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.14 टक्के इतका झाला आहे.  रविवारी राज्यात 50 रुग्णाची कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.85 टक्के एवढा झाला आहे. राज्यात 2,27,711 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 77,05,969 झाली आहे. सध्या राज्यात 12,61,198  व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,332 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


राज्यात आज ओमायक्रॉनचे पाच रुग्ण -
रविवारी राज्यात पाच नव्या ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. आज आढललेल्या सर्व रुग्णांचे रिपोर्ट राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून आले आहेत.  हे पाचही रुग्ण पुणे महानगर पालिका क्षेत्रातील आहेत. पाच रुग्णामुळे राज्यातील एकण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 3130 इतकी झाली आहे.  दिलासादायक बाब म्हणजे, राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांपैकी 1674 जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. आजपर्यंत एकूण 6605 नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी 6510 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि 95 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. 


मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर -  
मुंबईमधील नव्याने आढळणाऱ्या कोरोना (Corona)रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या बरीच अधिक असल्याच मागील काही दिवस सातत्याने दिसत आहे. आजदेखील (रविवारी) नव्याने आढळलेले मुंबईतील कोरोनाबाधित 1 हजार 160 असून 2 हजार 530 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 10 हजार 797 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत रविवारी सायंकाळी 6 पर्यंत समोर 1 हजार 160 नवे रुग्ण आढळले असून 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 612 झाली आहे. तर मागील 24 तासांत 2 हजार 530 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.