वर्धा : 'महाजनादेश' यात्रेच्या निमित्ताने भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या निमित्ताने भाजपने महाराष्ट्रात आपली रणनिती बदलल्याचं दिसत आहे. शहरी पक्ष म्हणून ओळखला जाणारा भारतीय जनता पक्ष आता ग्रामीण मतदार संघांवर लक्ष केंद्रित करत आहे.

भाजपच्या या बदलेल्या 'फोकस'चे दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'महाजानदेश' यात्रेतून दिसतो आहे.  या यात्रेची सुरुवात ग्रामीण भागातून म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या गुरुकुंज मोझरी येथुन झाली आहे. तसेच या यात्रेच्या मार्गात छोट्या मोठ्या गावात लोक दिसले कि देवेंद्र फडणवीस आपल्या विशेष बनवलेल्या रथाच्या हायड्रॉलिक लिफ्टचा वापर करून गाडीच्या छतावर येत लोकांचे स्वागत, अभिवादन घेत आहेत. अनेक छोट्या गावात ते 2-5 मिनिटांचे छोटेखानी भाषण करताना दिसत आहेत. छोट्या-छोट्या गावाच्या मंचांवर मुख्यमंत्री जात आहेत. त्याहून महत्वाचे म्हणजे यात्रेच्या संपूर्ण मार्गावरील जे स्वागत समारंभ, जाहीरसभा आहेत त्यातील 90% ह्या ग्रामीण भागात आहेत. यासाठी जिल्ह्याच्या गावच्या जागा देखील खुप कमी निवडण्यात आल्या आहेत. तिथे फक्त मुक्काम किंवा सकाळी  पत्रकार परिषद घेऊन पुढचा प्रवास सुरु होतो.

'2104 नंतरची गेली 5 वर्ष शहरांवर भाजपाचा कंट्रोल पक्का करायचा होता. भाजपची ओळख हि तशी म्हणायला शहरी पक्ष म्हणून आहे. गेली 5 वर्ष तुम्ही आमचा फोकस शहरांवर पाहिला, आता येणाऱ्या 5 वर्षात हा फोकस गावांकडे राहील', असे या महाजनादेश यात्रेत सामील असलेल्या एका मंत्र्याने सांगितले आहे.

2-4 हजार किलोमीटर लांब यात्रेत देवेंद्र फडणवीस जवळ जवळ 150 विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रातील मतदात्यांपर्यंत पोहचणार आहेत. यात एकूण भाजपा सरकारने काय केले? हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.  ग्रामीण जनजीवनात बदल घडवण्यावर सरकारने काय प्रयत्न केले यावर भरपूर फोकस आहे. सुरुवातीला विदर्भात ही यात्रा आहे. तिथे खास आधीच्या आघाडी सरकारवर निशाणा साधत सिंचन हा विषय मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मोठा केला आहे. त्याच बरोबर येत्या काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा आपला प्लान
असल्याचे सुद्धा ते इथे खास नमूद करत आहेत.

या यात्रेत अजून काही महत्वाचे बदल लक्षात येण्यासारखे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे महाजनादेश यात्रा जशी भाजपाचे 'रिब्रान्डींग' करते आहे तशीच ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील रिब्रान्डींग करते आहे. संपूर्णपणे देवेंद्र फडणवीस केंद्रित ही यात्रा मुख्यमंत्र्यांची इमेज राज्यव्यापी जननेता म्हणून घडवण्याच्या प्रयत्नात आहे. यात्रेच्या ऑफिशियल पोस्टरवर महाराष्ट्राचे दुसरे नेता म्हणजेच नितीन गडकरी यांचा साधा छोटा देखील फोटो नाही. त्यामुळे आताचे महाराष्ट्रावरील भाजपचे अधिपत्य हे फडणवीसांकडेच असल्याचे न बोलता नमूद होते आहे.