अलिबाग :  शरद पवार साहेब हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, वडिलांना वाटतं आपल्या मुलांना काही कळत नाही. म्हणून ते माझ्याबद्दल बोलले असतील. पोरगा कितीही पुढे गेला तरी बापाची तशीच भावना असते. त्यातून त्यांनी हे वक्तव्य केलं असेल. कदाचित माझ्या खांद्यावरुन त्यांना वांद्र्याच्या सिनियरवर आणि बारामतीच्या ज्युनियरवर निशाणा साधायचा असेल. तुम्ही देखील काही तरी करा असं सांगायचं असेल, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.


पवार यांनी काल 'फडणवीस कोकणात आले तर चांगलंच आहे. ते नागपूरचे आहेत. नागपूरचा आणि विदर्भाचा संबंध नाही. त्यामुळं इथं त्यांच्या ज्ञानात भर पडेल. मी बारामती सारख्या दुष्काळी भागातून येतो फडणवीस विदर्भातून येतात, त्यांचा समुद्राशी काहीही संबंध नाही त्यामुळे ते येत आहेत हे चांगलं आहे', असं टोला लगावला होता.

यावेळी फडणवीस म्हणाले की,  81 वर्ष वय असताना शरद पवार फिरत आहेत. कदाचित हे काम करत नसतील म्हणून त्यांना फिरावं लागत असेल, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.

फडणवीस यावेळी म्हणाले की, राज्यात पहिल्यांदा सरकार विरुद्ध सचिव असं चित्र आहे.  आपल्या मंत्र्यांचे ऐका, सचिवांचं ऐका, समन्वय करा हे मुख्यमंत्र्यांचे काम आहे. प्रशासनावर पकड मजबूत नाही. उद्धव ठाकरे यांना माझ्या सल्ल्याची गरज नाही. पण मित्र आहेत गेले पाच वर्षे एकत्र होतो तर हे सांभाळून घेतलं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.

यावेळी राज्यपालांबाबत बोलताना ते म्हणाले की, सरकार राज्यपालांना डावलू शकत नाही. यांनी कमिटी नेमली.  त्यांची भूमिका महत्वाची असताना मंत्री घोषणा करतात. मंत्र्यांना माहिती आहे का त्यांच्याकडे कोणते अधिकार आहेत? केटी परीक्षा होणार, इंजिनिअर, मेडिकल परीक्षा होणार मग कोणत्या परीक्षा होणार नाही? असा सवालही त्यांनी केला.


नुकसानीबाबत बोलताना ते म्हणाले की, लोकांना अधिकची मदत दिली पाहिजे. हा दौरा झाल्यावर मी अहवाल बनवणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. याबाबत केंद्राशी चर्चा झाली ते म्हणाले राज्याकडून प्रस्ताव आल्यावर मदत करु, असंही ते म्हणाले.

आघाडीतील तिन्ही पक्षांनी थोडेसे मॅच्युअर वागण्याची गरज आहे. कोरोना, चक्रीवादळ अशी संकटं असताना आपापसात भांडणं योग्य नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये तिन्ही पक्ष आहे.  त्यांनी सध्या सगळा फोकस हा कोरोना आणि आता वादळाने झालेलं नुकसान याकडे दिलं पाहिजे.  शासन आणि प्रशासन वाद योग्य नाही, असंही फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे 11 आणि 12 जून असे दोन दिवस कोकणाचा दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत.