गोंदिया : गावकऱ्यांनी पती आणि मुलाला मारहाण करुन अपमानित केल्यामुळे विवाहितेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरेगाव तालुक्यातील राजोली गावात हा प्रकार घडला.
सुभद्रा उईके यांनी विहिरीत उडी मारुन आयुष्य संपवलं. राजोली गावात राहणाऱ्या उईके पिता-पुत्राला 19 जुलै रोजी गावातल्या जमावानं मारहाण केली. या प्रकरणी सुभद्रा उईके यांनी 20 जुलैला पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र त्यानंतरही उईके कुटुंबाचा छळ सुरुच राहिला.
याला कंटाळून सुभद्रा उईके यांनी 23 जुलैला विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. सुभद्रा यांच्या आत्महत्येनंतर जाग आलेल्या पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सात जणांना अटक केली आहे. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर सुभद्रा यांची आत्महत्या टळली असती, असं म्हटलं जात आहे.