सोलपूर : महात्मा फुले जनआरोग्य योजना ही देशातील आपल्या राज्याने राबवलेली मोठी फ्लॅगशिप योजना आहे. या योजनेत 977 प्रकारच्या आजारांना कॅशलेस उपचार केले जातात.  मात्र लक्षणे नसलेल्या रुग्णांवर कोणतेही उपचार केले जात नाहीत. त्यांची फक्त काळजी घेतली जाते त्यामुळे या योजनेचा फायदा रुग्णांना मिळत नसेल. मात्र जर या योजनेत त्रुटी असतील तर रुग्णालयांकडून माहिती मिळवून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोलापुरातील कोरोनाविषयक घेतलेल्या आढाव्याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सोलापुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याविषयी आरोग्यमंत्र्यांनी देखील या बैठकीत चिंता व्यक्त केली. राज्यात सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या शहरांपैकी सोलापूर हे देखील आहे. सोलापूर शहरात जवळपास 11.22 टक्के इतका मृत्यूदर आहे. हे मृत्यूदर कमी करण्यासाठी सुचना दिले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सोलापुरात मृत्यूदर हे जास्त असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी कोमॉर्बीड (इतर आजार असलेले) रुग्ण हे जवळपास 83 टक्के इतके आहेत.  तर 17 टक्के रुग्ण हे फक्त कोरोनामुळे दगावले आहेत. सोलापुरातील डबलिंग रेट हा 22 दिवस असल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.

VIDEO | महात्मा फुले आरोग्य योजनेत काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासंदर्भात प्रयत्न करू-आरोग्यमंत्री टोपे



सोलापुरातील परिस्थिती सुधारण्यासाठी कोमॉर्बिड (इतर आजार) असलेल्या रुग्णांना अलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सुचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. सध्या जवळपास 400 लोक हे अलगीकरण कक्षात राहू शकतात त्यांची संख्या वाढवून जवळपास 2000 लोकांना अलगीकरण करता येईल अशी व्यवस्था उभी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. रुग्णांचे लवकर निदान होण्यासाठी स्वॅबसह रॅपिड अँटीजेन टेस्ट, एक्स रे, अँन्टीबॉडिस टेस्ट सारख्या टेस्ट देखील करण्याच्या सुचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. तर त्यासाठी लागणेर पोर्टेबल एक्स रे मशीन हे डीपीडीसीतून उपलब्ध करुन घेण्यात य़ाव्यात अशी सुचना देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान शासकीय रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसांड यावरुन पत्रकारांनी अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना धारेवर धरलं. भर पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विविध आरोप करत आरोग्य मंत्र्यांकडे शासकीय रुग्णालकडे विशेष लक्ष देण्याची विनंती केली. शासकीय रुग्णालयात पुरेशा प्रमाणात बेडची संख्या आहे. मात्र तरी देखील आणखी बेडची व्यवस्था कशा पद्धतीने करता येईल यासाठी चाचपणी सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पर्य़ायी व्यवस्था म्हणून शहरातील रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात भरती करता येईल का या विषयी देखील चाचपणी सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अनुदान आणि साहित्याची कोणतेही कमतरता पडणार नाही याची ग्वाही देखील यावेळी राजेश टोपे यांनी दिली. राज्यात रुग्णांच्या मदतीसाठी लागू करण्यात आलेल्या महात्मा फुले आरोग्य योजनेत काही त्रुटी असल्यास ते देखील दूर करण्याचे आश्वासन यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अँटिबॉडि टेस्ट आणि रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करुन घेण्यात याव्यात तसेच पावसाळ्यात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते त्यामुळे खासगी हॉस्पिटल सुरु राहतील याची काळजी प्रशासनाने घ्यावी अन्यथा कारवाई करण्याचे आदेश यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.