पत्रकात गोटे म्हणतात, भाजपमधील नेत्यांचे बारसे अन्य कुणी करायला पक्षातील नेत्यांनी संधीच शिल्लक ठेवली नाही. आपापसातील व्देष आणि स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की, त्यांनीच एकमेकांचे नामकरण करुन गुपचूप बारसे साजरे केले. देवेंद्र फडणवीसांना भाजपमधील विरोधी गटात असलेले अनेक नेते फडणवीसांना 'टरबुज्या' म्हणायचे! आता तर, तेच नामकरण सर्वश्रुत झाले, त्याला विरोधी पक्ष तरी काय करणार? असं अनिल गोटे यांनी आपल्या पत्रकात नमूद केलंय.
हेही वाचा- 'फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला लागलेला महारोग', वस्तुस्थिती असली तरी असं म्हणणार नाही : अनिल गोटे
अनिल गोटे यांनी 27 जूनला पुन्हा एक पत्रक प्रसिद्धी माध्यमांना दिलं आहे. या पत्रकात अनिल गोटे यांनी म्हटलं आहे की, राज्यातील भाजप नेते पडळकरांच्या नथीतुन मराठा समाजावर तीर मारुन धनगरांना उसकावीत आहेत. अर्थात पडळकरांनी आपल्या वक्तव्याच स्पष्टीकरण देतांना 'भावनेच्या भरात मी बोलून गेलो' असे म्हटले. भावनेच्या भरात बोलले असे खरे मानले तरी सुध्दा 'पोटात होत तेच ओठात आले' असा अर्थ होतो. भाजपचे प्रवक्ते राम कदम प्रसार माध्यमांसमोर बोलतांना 'अनिल गोटे यांचे वय झाले' असे म्हणाले. माझ्या वयाची त्यांना नेमकी काय अडचण निर्माण झाली हे मला समजले नाही. वयाचा आणि वक्तव्याचा नेमका संबंध आला कुठे? नाथाभाऊंच्या प्रकृती बद्दल पक्षातील विरोधकांकडून अशीच वक्तव्ये केली जात होती. राम कदमांना ऐवढेच सांगतो की, समुद्र किनारी जावून तोकड्या चड्ड्यांमध्ये फोटो सेशन केले. राहुल महाजनच्या समवेत महिलेशी केलेल्या वर्तनावर वयाचे मुल्यमापन करायचे का? माझ्याबद्दल जेवढे वैयक्तीक बोलाल तेवढेच मी तुम्हाला समजणाऱ्या भाषेत उत्तर देईन ! माझ्या नादी लागू नका,असा इशाराच गोटे यांनी दिला आहे.
गोटे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना मी महारोग म्हणालो नाही. संतापाच्या भरात वगैरे काही बोललो नाही. उलटपक्षी माझ्या मनात उसळलेल्या संतापाच्या ज्वालामुखीची आग बाहेर पडू नये म्हणून संयमी वक्तव्य केले. पत्रकात प्रसिध्दी माध्यमांशी जे बोललो तेच माझ्या पत्रकात आहे. शांत डोक्याने संतापावर नियंत्रण ठेवून लिहले आहे. फडणवीसांना महारोगाची उपमा दिली. 'महारोगी' असे म्हणालो नाही. याचे भान भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठेवावे, असे पत्रक अनिल गोटे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
वाचा- अनिल गोटे यांचं पत्रक
देवेंद्र फडणवीसांनी माझ्याशी केलेली धोकेबाजी, विश्वासघात जगजाहीर
अनिल गोटे यांनी 26 जून रोजी एक पत्रक जारी करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर गंभीर टीका केली होती. देवेंद्र फडणवीसांनी माझ्याशी केलेली धोकेबाजी, विश्वासघात जगजाहीर आहे. पण एकही धनगर विधानसभेत घेऊ नये यासाठी केलेली कारस्थाने, डावपेच आणि प्रसंगी विरोधकांना बळ देण्याचे त्यांनी केलेले उद्योग मी जाणून आहे. माझ्या मतदारसंघात 'मुसलमान आला तरी चालेल,पण अनिल गोटे येता कामा नये' यासाठी पैशांचा महापूर आला होता. पण मी संतापामध्ये मी कधी फडणवीस 'महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग' असं म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य अनिल गोटे यांनी केलं होतं. वस्तुस्थिती असली तरी तसे मी कधी बोलणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबातील कुणीही राजकारणात राहू नये, अशी हलकट, नीच आणि संकुचित बुद्धी फडणवीसांचीच असू शकते, असा आरोप देखील त्यांनी पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.आमदार होऊन आठ दिवस झालेत, तोवर पडळकरांना नशा चढली आहे. भारतीय जनता पार्टी आणि पक्षातील उच्चवर्णियांच्या संकुचिपणाची त्यांना अजून पुसटशी ओळखही नाही, असं गोटे यांनी म्हटलं होतं.