औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाऊनचा  फटका सर्वसामान्यांबरोबरच छोट्या- मोठ्या व्यापारी, उद्योजकांना बसला होता. या काळात धंदे बंद राहिल्याने सर्वच व्यापारी, उद्योजक आर्थिक अडचणीत सापडले. अशा या परिस्थितीत तग धरू न शकलेल्या पाच हजारांहून अधिक छोट्या-मोठ्या व्यापारी- उद्योजकांना गेल्या सहा महिन्यांत कायमचेच शटर डाऊन करावे लागले. आता कुठे स्थिती पूर्ववत होत असताना ओमायक्रॉन या नव्या कोरोना विषाणूच्या नव्या संकटाने उद्योग विश्वासमोर चिंता निर्माण केली आहे.


कोरोनानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देशात ऑटो हब म्हणून ओळखले असलेल्या औरंगाबाद उद्योगाची ही अशी स्थिती होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता कुठे यंत्राची धडधड सुरू झाली आहे. बेरोजगार झालेल्या लोकांना रोजगार मिळायला सुरुवात झाली आहे. त्यावर त्यांची उपजीविका भागू लागली आहे. कोरोनामुळे गाव  गाठलेले कामगार पुन्हा कुठे आता उद्योगनगरीत पोहोचलेत. त्यातच कोरोनाच्या नव्या विषाणूचं संकट डोकं वर काढू लागल्यानं उद्योजकांसमोर चिंतेचे काळे ढग उभारायला सुरूवात झाली आहे.
 
कोरोनामुळे उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांचे कर्जाचे हप्ते थकले, अनेकांचे भाडे थकले. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या अनेक उद्योजक, व्यापाऱ्यांनी डबघाईला आलेले धंदे बंद करण्याचा निर्णय घेतला. आजघडीला जीएसटी कार्यालयाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार कोरोनाच्या या काळात नोंदणीकृत 5 हजार 383 उद्योगधंदे बंद पडल्याचे दिसत आहे. 


जीएसस्टी विभागाची आकडेवारी काय सांगते?
 
औरंगाबाद राज्यकर विभागाकडे एकूण 55545 करदात्यांची नोंदणी झालेली होती. 
रिटर्न दाखल न करू शकल्याने जानेवारी ते जूनपर्यंत यातील 5383 जणांचे रजिस्ट्रेशन रद्द झाले.
त्यामुळे विभागाकडे नोंदणीत करदात्यांची संख्या घटून 51142 वर आली आहे.
सलग सहा महिने कर भरू न शकलेल्या 4022 व्यापाऱ्यांचे जीएसटीएन रजिस्ट्रेशन कॅन्सल झाले आहे. जानेवारी, फेब्रुवारी  आणि मार्च महिन्यातील ही संख्या आहे. तर एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत 1381 व्यापाऱ्यांची जीएसटी नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
सहा महिन्यांत एकूण 5383 व्यापाऱ्यांचे जीएसटीएन रजिस्ट्रेशन कॅन्सल झाले आहे. यात कंपोझिशन मधील किरकोळ व्यापाऱ्यांसह जे यापूर्वी जीएसटीचा नियमित भरणा करीत होते, अशा व्यापाऱ्यांचा समावेश आहे.
 
त्यातच आता ओमायक्रॉनच्या भीतीचा सर्वाधिक फटका पुन्हा उद्योग विश्वाला बसण्याची चिन्हं आहे. नेस्ले, मार्स रिंगले, सुझुकीसह अनेक बड्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध आणले आहेत.. कोरोनाची भीती कमी झाल्यानंतर गेल्या तिमाहीत अर्थव्यवस्था थोडी सुधारण्याचे संकेत देत असताना हा नवा व्हेरिएंट पुन्हा आर्थिक गाडं बिघडवणार की काय..? अशी भीती निर्माण झाली आहे. 


लॉकडाऊनमुळे सर्वच व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यातही कर्ज घेतलेल्या असंख्य व्यापाऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले. ओमायक्रोन या नव्या विषाणूचा संकट वाढत गेलं आणि पुन्हा लोक डाऊन करण्याची वेळ आली तर महिनाभरात आणखी शेकडो व्यापारी आपले उद्योग धंदे कायमचे बंद करतील, अशी परिस्थिती आहे.