Shivsena Sanjay Raut Will Meet Rahul Gandhi Priyanka Gandhi :  शिवसेना आणि काँग्रेसमधील जवळीक वाढत असल्याचे समोर येत आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांची भेट घेणार आहेत. ही भेट मंगळवारी आणि बुधवारी होणार आहे. आगामी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार असल्याचे म्हटले जात आहे. 


एका बाजूला तृणमूल काँग्रेस व इतर काही राजकीय पक्षांकडून काँग्रेसवर युपीए आघाडीच्या मुद्यावरून टीका सुरू होती. मात्र, शिवसेनेने मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून युपीए आघाडीचे समर्थन केले होते. त्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत हे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा यांची भेट घेणार आहेत. 


पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या प्रियांका गांधी लखनऊमध्ये आहेत. त्या दिल्लीत परतल्यानंतर त्यांच्यासोबत संजय राऊत यांची भेट होणार आहे.  


संसदेच्या मागच्या अधिवेशनात राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात भेट झाली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वासोबतही अगदी सहजतेनं आणि वारंवारपणे भेटी होत आहेत. उत्तर प्रदेशात शिवसेनेची फारशी ताकद नसली तरी या निवडणुकीत भाजप हिंदुत्वाचा मुद्दा आणणार असल्याचे संकेत मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचा प्रतिवाद करण्यासाठी शिवसेनेची मोठी मदत होऊ शकते असा कयास बांधला जात आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha