Dhananjay Munde : शिर्डीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन सुद्धा शिर्डीमध्ये पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनासाठी शिर्डीमध्ये जयत तयार करण्यात आली असून उद्यापासून (18 जानेवारी) दोन दिवस शिर्डीमध्ये हे अधिवेशन होत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला वादामध्ये अडकलेले मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्रिमंडळातून डावण्यात आल्याने नाराजीचा सूर लावलेल्या छगन भुजबळ सहभागी होणार की नाहीत? याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या उद्याच्या अधिवेशनाला छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. प्रकृती ठिक नसल्याने भुजबळ अधिवेशनाला उपस्थित राहणार नाहीत.
धनंजय मुंडे अधिवेशनाला उपस्थित राहणार
दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांचा अत्यंत निकटवर्तीय आणि परळीची सूत्रे ताब्यात ठेवणारा खंडणीखोर वाल्मीक कराड सध्या एसआयटीच्या कोठडीत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे अधिवेशनाला उपस्थित राहणार की नाही याबाबतही चर्चा रंगली होती. मात्र, धनंजय मुंडे शिर्डीमध्ये अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
धनंजय मुंडेचा परळीत जनता दरबार
दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले.धनंजय मुंडे यांनी आपल्या जगमित्र कार्यालयात जनता दरबारही घेतला. या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ते गाठीभेटी घेत आहेत. दरम्यान, परळीमधील बाजारपेठ सुरळीत झाली आहे. धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय खंडणीखोर वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर मंगळवारी शहरात तीव्र पडसाद उमटले. परळी पोलीस ठाण्यासमोर कराड नातेवाईकांनी आंदोलन करून चार समर्थक कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. बुधवारी पांगरी गावात कराड समर्थक यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले. वाल्मीक कराडवरील खोटे गुन्हे मागे घ्या, या मागणीसाठी दोन दिवस परळी शहर बंद होते. तसेच परळी तालुक्यातील धर्मापुरी ,सीरसाळा येथेही बंद पुकारण्यात आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या