Walmik Karad Santosh Deshmukh Murder Case Updates: वाल्मिक कराड (Walmik Karad) सध्या एसआयटीच्या कोठडीत आहे. एसटीच्या माध्यमातून बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची चौकशी सुरू असल्याने बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक तर विशेष पोलीस पथक या ठिकाणी तैनात केले आहे. खंडणी प्रकरणात सीआयडीची 14 दिवसांची कोठडी संपल्यानंतर कराड एसआयटीच्या ताब्यात असून सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. याच पार्श्वभूमीवर सध्या बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर बंदोबस्त वाढविण्यात आला असून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची नोंद केली जाते आहे. याचदरम्यान एक नवीन माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवासांआधी वाल्मिक कराडचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले होते. या जप्त केलेल्या मोबाईलमधील काही सिमकार्ड विदेशात रजिस्टर असल्याची माहिती समोर आली होती. तसेच या सिमकार्डवरुन काहीजणांना फोनही गेल्याचे सांगितले जात होते. आता विदेशातून फोन करणारा व्यक्ती वाल्मिक कराडचाच नातेवाईक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाल्मिक कराडचा आर्थिक व्यवहार पाहणारा व्यक्ती देखील विदेशात जाऊन बसलाय, अशी सीआयडीकडे माहिती आहे. वाल्मिकची जवळच्या नातेवाईकाच्या नावे विदेशात गुंतवणूक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सीआयडीकडून कराडची विदेशात काही संपत्ती आहे का? याचा शोध सुरू आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता किरण पाटील करणार-
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीचे किरण पाटील करणार आहे. अनिल गुजर यांच्याकडील तपास आता किरण पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मकोका कायद्याअंतर्गत कारवाई झाल्यास त्या प्रकरणाचा तपास डीवायएसपी रॅंकच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येतो. आतापर्यंत या प्रकरणाचा तपास करणारे अनिल गुजर हे पोलीस निरिक्षक रॅंकचे अधिकारी आहेत . त्यामुळे त्यांच्याकडील तपास डीवायएसपी अर्थात उप अधिक्षक रॅंक असलेल्या किरण पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणादरम्यान आरोपी वाल्मिक कराड इतर आरोपींच्या संपर्कात-
सुदर्शन घुले व त्याचे साथीदारांनी मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांच खून केला आहे. याकाळात सुदर्शन घुले, विष्णू चाटे व वाल्मीक कराड यांचे घटनेच्या अगोदर, नंतर का घटनेदरम्यान एकमेकांना कॉल असल्याचे सीडीआरवरुन दिसत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणादरम्यान आरोपी वाल्मिक कराड इतर आरोपींच्या संपर्कात असल्याचे सीडीआरवरुन दिसून येत आहे, असे मुद्दे एसआयटीने न्यायालयात मांडले. दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.