पुणे : नोटाबंदी एक क्षणात झाली तसे राम मंदिर का नाही होऊ शकत? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक पुण्यात पार पडली.


या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मुंबईतील खड्डे, नाणारचा प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प आणि महाविद्यालयात भगवदगीता वाटप या विषयांवर भाष्य केलं.

राम मंदिर, समान नागरी कायदा, 370 कलम रद्द करणे या सगळ्या गोष्टी आतापर्यंत का नाही झाल्या? असा सवाल त्यांनी केला. शिवाय नोटाबंदी एक क्षणात झाली, तसे राम मंदिर का होऊ शकत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

भगवदगीता मला चाळायची आहे ती नक्की संस्कृतमध्ये आहे की गुजरातीत आहे असा भाजपला तिरकस टोला त्यांनी लगावला. परीक्षा निकाल वेळेवर न लागणे, पेपर फुटी प्रकार हे सगळं झाकण्यासाठी भगवदगीतेचा विषय काढण्यात आला का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

विद्यापीठाचा गोंधळ टाळण्यासाठी भगवदगीता वाटपाचा विषय काढण्यात आला. त्यापेक्षा निकाला वेळेवर लावा, असंही ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प लादणार नाही, असं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे काहीही झालं तरी नाणार प्रकल्प होऊ देणार नाही या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

पावसाळा सुरु झाल्यापासून शिवसेना सत्तेत असलेल्या मुंबईत जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे अपघात होऊन काही जणांना आपले प्राणही गमावावे लागले. मात्र उद्धव ठाकरे यांना खड्डयांबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी खड्ड्यांची जबाबदारी सर्वांचीच असल्याचं सांगितलं.