हा पाहुणा दुसरा-तिसरा कोणी नसून एक हार्नबिल पक्षी आहे.
रोज पहाटे हा ग्रे हॉर्नबिल म्हणजेच राखाडी धनेश पक्षी खडसेंच्या बेडरुमच्या खिडकीजवळ येतो आणि बंद असलेल्या खिडकीवर जोर जोरात आपली चोच आपटतो. या चोचेच्या आवाजामुळं खडसेंना पहाटेच उठावं लागतं.
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचं फार्म हाऊस आहे. इथेच खडसे वास्तव्यास असतात. खडसेंच्या फार्म हाऊसमध्ये अनेक फळझाड आणि फुलझाडं आहेत. त्यामुळं अनेक पक्षी इथं येतात. काही दिवसांपूर्वी इथं एक हॉर्नबिलची जोडी वास्तव्यास आली आहे.
हॉर्नबिलचा हा सहवास खडसेंना सध्या चांगलाच भावतोय.
हॉर्नबिलचं आपल्या घर -परिसरात वावरणं आणि त्याने खिडकीच्या काचेवर चोच आपटून पहाटे लवकर उठवणं, आपल्यासाठी आनंददाई अनुभव असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.
धनेश पक्षांच्या अनेक जातींपैकी महाराष्ट्रात आढळणारी ही जात. जोडीनं राहणाऱ्या या पक्षाचं राहणीमानही खूप सुंदर असतं. पण खडसेंच्या बेडरुमच्या काचेवर चोच आदळण्याचं कारणं नेमकं काय?
खडसेंच्या बेडरुमची खिडकी पारदर्शी नाही, तर आरशासारखी आहे. ज्यामध्ये हा धनेश आपला चेहरा पाहतो..आणि कदाचित त्याला प्रतिस्पर्धी वाटल्यानं तो चोच आदळतो.
हातनूर धरणामुळं मुक्ताईनगरच्या परिसरात निसर्ग जोपासला गेला आहे. इथं बिबट्यांसह इतर वन्यप्राण्याचं चांगलं वास्तव्य आहे. त्यामुळं आता खडसेंच्या प्रयत्नानं इथं एखादं अभयारण्य उभं राहिलं तर ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असेल.