कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात सलग सातव्या दिवशी मुसळधार पाऊस बरसत आहे. यामुळे पंचगंगेच्या पातळीची धोक्याकडे वाटचाल सुरु आहे. शहरातील गायकवाड वाड्याजवळ पाणी आलं आहे. पावसाचा जोर वाढल्यानं 65 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर तब्बल 63 गावांचा अंशता संपर्क तुटला आहे.

सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 38.8 इंच इतकी आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर आज पंचगंगा इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे.

जिल्हयात 16 घरांची पडझड झाली आहे. तर 65 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शिवाय 5 राज्यमार्ग आणि 16 जिल्हामार्गांवर पाणी आलं आहे. या मार्गावरील वाहतूक वळवली आहे. या मार्गावरील गावांचा संपर्क तुटलेला नाही, पर्यायी मार्गावरुन वाहतूक सुरु आहे.

शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात पाणी शिरलं आहे. नदीकाठच्या गावांनाही यामुळं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. बहुतेक सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने जिल्ह्याच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीलाही पूर आला आहे. दरम्यान राधानगरी धरणातून 1600 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

धरण क्षेत्रातही जोरदार सरी

धरणांच्या परिसरात गुरुवारी अतिवृष्टी झाली. राधानगरी धरण परिसरात 125 मि.मी., कडवी परिसरात 112 मि.मी., कुंभी परिसरात 130 मि.मी., पाटगाव परिसरात 142 मि.मी., चिकोत्रा परिसरात 110 मि.मी., चित्री परिसरात 102 मि.मी., घटप्रभा परिसरात 109 मि.मी., जांबरे परिसरात 121 मि.मी., तर कोदे धरण परिसरात 215 मि.मी. पाऊस झाला. तुळशी परिसरात 73 मि.मी., वारणा परिसरात 74 मि.मी., दूधगंगा परिसरात 84, तर कासारी परिसरात 79 मि.मी.पाऊस झाला. जंगमहट्टी धरण परिसरात 45 मि.मी.पाऊस झाला.

संबंधित बातम्या 

VIDEO: मी पंचगंगा बोलतेय! पंचगंगेचं हवेतून दर्शन, माझाचा विशेष रिपोर्ट