Vishal Phate Scam : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi)तालुक्यासह महाराष्ट्रात सध्या विशाल फटे (vishal phate) याच नावाची चर्चा सुरू आहे. त्याला कारणही तसंच आहे. विशाल फटे याने बार्शी आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेकांची कोट्यवधी रूपयांची  फसवणूक केली आहे. या प्रकरणात बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींना मोठा फटका बसला आहे, अशी चर्चा सुरु आहे. तर अनेक गोरगरीबांना देखील विशाल फटेनं चुना लावला आहे. परंतु, कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या विशालबद्दल समोर आलेली माहिती थक्क करणारीच आहे.


विशाल फक्त बीए पास
अनेकांना कोट्यावधी रूपयांचा चुना लावलेला विशाल हा फक्त बीए आहे. विषेश म्हणजे ही पदवी त्याने यशवंतराव मुक्त विद्यापीठातून घेतली आहे. 11 वीचे शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यात आला. परंतु, 11 वी मध्ये तो नापास झाला. त्यामुळे  12 वीसाठी त्याच्या कुटुंबीयांनी त्याला बार्शीला आणले. बार्शीत तो 12 वीत कसा तरी पास झाला. परंतु, आपण आयटी इंजिनीयर असून एमबीए फायनान्सचं शिक्षण घेतल्याचे तो सांगत असे. विशालचे इंग्रजी भाषेवर चांगलेच प्रभुत्व होते. त्यामुळे तो अनेकांना हुशार वाटायचा. लोक त्याच्या बोलण्यावरूनच त्याच्यावर विश्वास ठेवायचे.  


अनेकांची उडवली झोप 
गोव्यातून बार्शीत परतल्यानंतर विशालने मोठे होण्याची स्वप्नं दाखवून अनेकांची झोप उडवली. तीन महिन्यात पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून कोट्यावधींची माया विशालने जमा केली. परंतु, हाच विशाल आता 9 जानेवारीपासून फरार आहे. त्यामुळे आधी श्रीमंत होण्याची स्वप्न दाखणाऱ्या विशालने अनेकांची झोप उडवली आहे. 


विशाल मुळचा मंगळवेढ्याचा 
विशाल बार्शी येथील शिवाजी महाविद्यालयासमोर नेट कॅफे चालवत होता. नेट कॅफे चालवत असतानाच तो छोट्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक देखील करत होता. परंतु, आपण मागील 10 ते 15 वर्षांपासून शेअर मार्केट करत असल्याचे लोकांना सांगत होता. विशाल फटे हा मुळचा मंगळवेढा तालुक्यातील आहे. त्याचे वडील बार्शीतील एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून ते बार्शीतच वास्तव्यास होते. सध्या बार्शीतील अलीपूर रोड ते उपळाई रोड दरम्यान तो राहायला होता. 


विशालचा 'विशाल घोटाळा' 
फक्त बीए पास झालेला विशाल हा अलका शेअर सर्व्हिसेसचा संस्थापक असून फोग्स ट्रेडिंग कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. याबरोबरच NSEBSE चे सदस्य असल्याची माहिती तो लोकांना सांगायचा. त्याने 2019 पासून अनेकांकडून गुंतणूक करून घेतली. यातील अनेकांना त्याने 28 टक्के परतावाही दिला. धक्कादायक बाब म्हणजे 27 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते विशालला एका वाहिनीचा पुरस्कार देण्यात आला होता. 


विशालने बार्शीत बरेच मित्र जमवले होते. अगदी सख्या भावाप्रमाणे विशालचे मित्र त्याला वागणूक देत होते. विशालने याच विश्वासाचा फायदा घेत अनेक मित्रांचे अकाऊंट वापरले. गुंतवणुकदारांना मित्राच्या अकाऊंटवर पैसे टाकायला सांगायचे. मित्रांकडून चेक घेऊन ते पैसे काढून घ्यायचे असे उद्योग तो करत होता. फरार होण्याआधी देखील त्याने अशाच पद्धतीने एका मित्राच्या अकाऊंटवर जवळपास 35 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. नंतर चेकद्वारे त्याने ते काढून देखील घेतले. अशी माहिती या प्रकरणी प्रथम फिर्याद दिलेले दीपक आंबरे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. 


10 लाखांचे वर्षात 6 कोटी
विशाल हा गुंतवणुकदारांना वेगवेगळी स्किम सांगून अमिष दाखवत होता. डिसेंबर महिन्यात अशाच पद्धतीची एक ऑफर त्याने गुंतवणुकदारांना दिली. 'एक जानेवारी 2022 पासून एक नवीन स्कीम सुरु होत आहे. ज्यामध्ये केवळ 40 गुंतवणुकदारांना घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही स्कीम केवळ नवीन गुंतवणुकदारांसाठी आहे. या स्कीमनुसार जर 1 जानेवारी 2022 रोजी तुम्ही 10 लाख रुपये जमा केले आणि त्यानंतर 1 वर्ष कोणताही परतावा घेतला नाही तर तुम्हाला 2023 साली 6 हजार टक्के परतावा मिळेल. म्हणजेच 10 लाखांचे वर्षात 6 कोटी रुपये होतील' अशी ऑफर दिल्यानंतर अनेक जणांना धक्काच बसला. त्यामुळे त्याच्याकडे अनेकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली.  


6 कोटींसाठी अनेकांनी विकल्या जमीनी
दहा लाख रूपयांची गुंतवणूक केल्यानंतर एका वर्षात 6 कोटी रूपये मिळणार असे अमिष विशालने दाखवल्यानंतर 6 कोटी घेण्यासाठी बार्शीत अनेकांनी आपल्या जमीनी विकल्या, फ्लॅटवर लोन काढले. कित्येकांनी सोने गहाण ठेवले. तर काही जणांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन गुंतवणूक केली.  


फोटोंना भुलले अन् लाखोंना बुडाले 
विशाल उच्च पदस्थ अधिकारी, राजकारण्यांसोबतचे फोटो लोकांना दाखवयाचा. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे एका वाहिनीने केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते दिलेला पुरस्कार. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळाल्याचे लोकांना सांगताच अनेकांचा त्याच्यावरील विश्वास वाढला. सत्कारासाठी ऑफिसमध्ये रांगा, सोशल मीडियावर फोटो फिरु लागले होते. यामुळे केवळ बार्शीच नाही तर महाराष्ट्रातील अन्य भागांमधून देखील लोकांनी पैसे विशालकडे गुंतवले. परंतु, हे सगळे खोटे असल्याचे समजल्यानंतर आपण फक्त फोटो पाहून लाखोंना बुडाल्याची भावना लोक व्यक्त करत आहेत. 


तीन महिन्यात दाम दुप्पट 
विशाल हा तीन महिन्यात पैसे दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवत असे. प्रथम त्याने लोकांकडून लाखो रुपये घेतले. त्यांना मोठा परतावा देऊन लोकांचे विश्वास संपादन केले. त्यानंतर तीन महिन्यात दाम दुप्पट देण्याचे आमिष त्याने अनेकांना दिले. आधी दिलेल्या परताव्यवरून अनेकांनी विश्वास ठेवून कोट्यावधी रुपये फटे याच्याकडे गुंतवणुकिसाठी दिले होते.  


'फटे'नं फाट्यावर मारलं, उधारी बंद!
दरम्याना या प्रकरणानंतर आता सोशल मीडियावर जोक्स आणि काही पाट्या देखील व्हायरल होऊ लागल्या आहेत.  'फटे'नं फाट्यावर मारलं, उधारी बंद! अशी पाटी एका दुकानदारानं लावली आहे. ही पाटी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
 
तक्रारदारांचा आकडा वाढला
विशालच्या विशाल घोटाळ्यासंदर्भात आतापर्यंत 76 जणांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फसवणूकीचा आकडा तब्बल 18 कोटींवर पोहोचला आहे. 


Solapur Barshi Scam : बार्शीतील 'फटे स्कॅम' ; मित्राच्याच तोंडून ऐका विशाल फटेच्या फसवणुकीची कहाणी



महत्वाच्या बातम्या