परभणी : परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार एवढा बिघडला आहे की इथे उपचार घेणाऱ्या रुग्णाचे रुग्णालय प्रशासन जीव घेतल्यानंतर सुधारणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. नाशिकची घटना घडल्यानंतरही यातून आपण काहीच बोध घेतला नसल्याचे काल परभणीत घडलेल्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेवरून सिद्ध झाले आहे.
वादळी वाऱ्याने पडलेले झाड हे केवळ ऑक्सिजनच्या पाईप लाईनवर नाही तर परभणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या एकुण कारभारावरच कोसळले. या प्रकारात सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्परता दाखवली आणि 14 रुग्णांचे प्राण वाचले. अन्यथा या रुग्णालय यंत्रणेचा खरा चेहरा समोर आला असता. जिल्हा सामान्य रुग्णालयात नेहमी काही ना काही विचित्र घटना घडताहेत आणि जिल्हाधिकारी समित्या नेमुन वेळ मारून नेत आहेत. ना कारवाई, ना प्रशासनाच्या कामात सुधारणा. या प्रत्येक घटनांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांचा बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे. परंतु, प्रशासनाने मात्र शल्य चिकित्सकांना अभय देण्याचे काम केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांचा कारभार दिवसेंदिवस रुग्णांना मृत्यूकडे ओढतोय, असे आरोप आता होत आहे.
Oxygen Leakage | परभणीत नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती टळली, 14 रुग्णांचा जीव वाचला
फेब्रुवारी रोजी याच अपघात कक्षाच्या पायऱ्यांवर आग लागली होती. ही आग विझवली तोच सकाळी रुग्णालयातील लॉन्ड्रीला पुन्हा आग लागली. बालरुग्ण कक्षातील छताचे प्लास्टर कोसळले. मागच्या वर्षी चक्क ऑक्सिजनची पाईप लाईनच चोरीला गेली. 3 एप्रिलला ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. चक्क नर्सने रुग्णालयातुन चोरलेले रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री केले. आणि आता उघड्यावर असलेल्या ऑक्सिजन पाईप लाईनवर झाड कोसळले. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाली नसली तरी या घटना गंभीर असुन जिल्हा रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आणणाऱ्या आहे. या घटनांपैकी एकाही घटनेत कारवाई मात्र झाली नाही. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त असो अथवा पालकमंत्री यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची पाठराखणच केली.
परभणी जिल्ह्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या प्रचंड वाढलीय. महत्वाचे म्हणजे मृत्यूचा आकडा हा लक्षणीय आहे. 31 मार्च ते 27 एप्रिल या 28 दिवसांमध्ये जिल्ह्यात 421 रुग्णांचा मृत्यू झालाय. रुग्णांना ना रेमडेसीवीर मिळतंय ना ऑक्सिजन, डॉक्टर राउंडला येताहेत, ना रुग्णावर उपचार होत आहेत. यंत्रणेवर निश्चितच ताण आहे. त्यातच कोरोनाच्या या गंभीर स्थितीतही जिल्हा रुग्णालयात शल्य चिकित्सकांचे समर्थक आणि विरोधक असे वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्येही दोन गट पडले आहेत. त्यातुन रुग्णांना मात्र वाऱ्यावर सोडले जात आहे.