मुंबई : उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी कर्जमाफी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासंदर्भात एबीपी माझाने राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

"कर्जमुक्तीबाबत महाराष्ट्र सरकार अनुकूल आहे. मात्र, कर्जमुक्ती कधी आणि कशी द्यायची, यावर चिंतन सुरु आहे.", अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

उत्तर प्रदेशात दिलेला शब्द पूर्ण केला, मग महाराष्ट्रातही करणार. सत्ता क्षणभंगूर आहे, सत्तेवर प्रेम करण्यासाठी आलो नाहीय, असेही मुनगंटीवार म्हणाले.

"भाजप सरकार जो शब्द देतो, तो पूर्ण केला जातो. उत्तर प्रदेशात भाजपने दिलेला शब्द पाळला, तसाच महाराष्ट्रात दिलेलं आश्वासनही पूर्ण केलं जाईल. आश्वासन पूर्ण करणारं सरकार म्हणजे भाजप सरकार आहे.", असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

महाराष्ट्रात 30 हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती द्यावी लागणार आहे. मात्र, जे शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यांनी थांबू नये. त्यांच्यासाठी वेगळी योजना आणली जाईल, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी आवर्जून सांगितले.

राजू शेट्टी काय म्हणाले?

"उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतो. महाराष्ट्र सरकारनेही अंमलबजावणी करावी. कारण महाराष्ट्रात उत्तर प्रदेशपेक्षा वाईट परिस्थिती आहे.", असे खासदार राजू शेट्टी एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. शिवाय, शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. त्यांना तातडीने कर्जातून मुक्त करावं, असा इशाराही शेट्टींनी यावेळी दिला.

उत्तर प्रदेश सरकारची आर्थिक स्थिती चांगली आहे, अशातला भाग नाही. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांसाठी असं पाऊल उचललं. योगी सरकारने कर्जमुक्ती केल्याने आमच्या आंदोलनाला नैतिक बळ मिळालं आहे. त्यामुळे यापुढे आंदोलनाची तीव्रता वाढवू, असेही शेट्टी म्हणाले.

सुधीर मुनगंटीवर यांच्यावर विश्वास, मात्र सरकारने गांभीर्य लक्षात घ्यावं, अशी विनंतीही खासदार राजू शेट्टींनी यावेळी केली.

महाराष्ट्रातील स्थिती काय आहे?

  • महाराष्ट्रात एकूण 1 कोटी 36 लाख खातेदार शेतकरी आहेत.

  • 2 हेक्टर म्हणजे 5 एकर जमीन असलेले शेतकरी 1 कोटी 7 लाख आहेत.

  • किमान अडीच एकर जमीन असलेले शेतकरी 67 लाख 9 हजार आहेत.

  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या एकूण कर्जमाफीसाठी 30 हजार कोटी रुपयांची गरज आहे.

  • 5 एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांवर एकूण 20 हजार कोटींचा बोजा आहे.