पुणे: 'मेक इन इंडिया'बरोबर 'थिंक इन इंडिया' मोहीमही सुरु करायला हवी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. ते पुण्यात बोलत होते.

"खाजगी शिक्षण संस्थांवर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे. संसदेतदेखील हा विषय आला होता. गरज असल्यास जरुर असे नियंत्रण आणावे. मात्र, त्यामुळे या शिक्षण संस्थांचा श्वास गुदमरणार नाही, याची काळजी घ्यायला हवी", असं पवार म्हणाले.

शिक्षण क्षेत्रात संख्यात्मक वाढ झाली पण गुणात्मक वाढ झालेली नाही, अशी खंत पवारांनी व्यक्त केली. त्यामुळेच 'मेक इन इंडिया'बरोबरच 'थिंक इन इंडिया' मोहीम सुरु करायला हवी असं पवार म्हणाले.

पुण्यात आज भारती विद्यापीठाचा 18 वा पदवीदान समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते. याच कार्यक्रमात पद्मविभूषण शरद पवार यांना डी लिट पदवी देऊन त्यांचं गौरव करण्यात आला.

भारती विद्यापीठाचे कुलपती पंतगराव कदम आणि कुलगुरू शिवाजीराव कदम यांच्या हस्ते पवारांना पदवी प्रदान करण्यात आली.

यावेळी पवारांनी भाषणाच्या सुरुवातीला किशोरी आमोणकर यांचं स्मरण केलं. संगीत क्षेत्रात किशोरी अमोणकर यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळेच त्यांना गानसरस्वती असं संबोधलं जातं, अशा शब्दात पवार यांनी श्रद्धाजंली वाहिली. तसंच त्यांचं अवघा रंग एक झाला हे गाणं महाराष्ट्र कधीही विसरणार नाही, असं पवार म्हणाले.