Maharashtra and Karnataka interstate coordination meeting : महाराष्ट्र आणि कर्नाटक (Maharashtra and Karnataka) या दोन राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी या दोन राज्यांच्या राज्यपालांच्या उपस्थितीत आज कोल्हापूरमधील रेसिडन्सी क्लबमध्ये ‘आंतरराज्य समन्वय’ बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. 


कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूरचे जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे सीमाभागातील बेळगाव, विजयपुरा, कलबुर्गी, आणि बिदरचे जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सीमाभागात भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच सीमाभागात हत्तींमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या दाखल्यांचे प्रश्न उपस्थितित होण्याची शक्यता आहे. 


या बैठकीत अलमट्टी धरणासह महत्त्वाच्या निर्गमांवर चर्चा होणार आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीमुळे कोल्हापूर आणि सांगली भागात 2005, 2019 आणि 2021 मध्ये मोठ्या पुराचा सामना करावा लागला, त्यानंतर धरणाची पाणी पातळी 517.50 मीटर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, कर्नाटक सरकारकडून अनेकदा या पातळीचे उल्लंघन केले जाते. या वर्षीही अलमट्टी धरणाची पाणीपातळी 519 मीटरवर आढळून आली. कोल्हापूर व सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून यापूर्वी निश्चित केलेली 517.50 मीटर उंचीचे काटेकोरपणे पालन करण्याची मागणी करण्यात येणार आहे.


एकसंध होऊन लढा उभा करण्याची गरज


अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कृष्णा नदीपात्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर फुगवटा निर्माण होऊन कृष्णा नदीकाठावरील गावांचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. गावे, शेती पर्यायाने सारे जीवनच उद्धस्त होण्याची भीती आहे. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय सध्या गत्यंतर नाही. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कर्नाटक राज्यातील अनेक गावे कायमची संकटात सापडणार आहेत. 2005, 2019, 2021 या सालात अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यावेळी आलेल्या महाप्रलंयकारी महापुराचे नुकसान पाहता संपूर्ण शिरोळ तालुक्यासह सांगली - कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक गावांचे पुनर्वसन करावे लागले होते.


महाराष्ट्रातील कोयना, पंचगंगा, कृष्णा, वारणा, दूधगंगा या नद्यांचे पाणी कृष्णेद्वारे अलमट्टीलाच मिळते. अतिवृष्टीत जर तेथे पूर्ण क्षमतेने पाणी अडविले गेले, तर या सर्व नद्यांना पुन्हा महाभयंकर पूर येऊ शकतो. या अगोदरही कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी अलमट्टीची उंची वाढविण्याचे जाहीर केले होते, मात्र कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जनतेने रस्त्यावर उतरूनआंदोलन केले. आताही काही संघटना या विरोधात आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या