Kartiki Ekadashi : मी अतिशय समाधान आहे की, आज मला विठूमाऊलीची पुजा करण्याची संधी मिळाली. हा अतिशय भाग्याचा योग असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. विठ्ठल हा सामान्य माणसांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा देव आहे. त्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावेत, त्यांच जीवन सुजलाम सुफलाम व्हावं, यासाठी कार्य करण्याची शक्ती आम्हाला मिळावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही नेहमीच विठ्ठलाला करत असतो असे फडणवीस म्हणाले. ही पुजा मनाला शांती देणारी असल्याचेही ते म्हणाले.
 
आज कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) आहे. यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापुजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शिरोड गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. ही शासकीय महापुजा संपन्न झाल्यानंतर फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 


विकास करताना पंढरपूरची कोणतीही परंपरा खंडीत होणार नाही


मंदिर परिसरात कॉरीडॉर तयार करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याबाबत मी काल बैठक घेतली आहे. विकासकामं करत असताना पंढरपूरची कोणतीही परंपरा खंडीत होणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत. कोणालाही विस्थापीत करणार नाही. मात्र, काही जागा घ्यावा लागतील, त्या जागा घेत असताना त्यांना योग्य त्या प्रकारचे पुनर्वसन करण्याची, त्यांचा व्यवसाय योग्य चालला पाहिजे यासंबंधीची काळजी घेतली पाहिजे असे फडणवीस म्हणाले. अतिशय चांगला कॉरीडॉर तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कॉरीडॉरचे काम करायला जरी वेळ असला तरी मंदिराचे काम करायला आम्ही तत्काळ करायला सुरुवात करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.


आम्ही विस्थापीतांना प्रस्थापीत करणारी माणसं


महाराष्ट्रात शिंदे साहेबांचे आणि आमचं सरकार आहे. आम्ही मोदीसाहेबांच्या नेतृत्वात कामं करतो. त्यामुळं आम्ही कोणाला विस्थापीत करत नाही. विस्थापीतांना प्रस्थापीत करणारी माणसं आम्ही असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. दरम्यान, शासकीय महापुजा संपन्न झाल्यानंतर संत नामदेव महाराजांनी अवघ्या विश्वाला दिलेल्या समता, बंधुता या संदेशाला उजाळा देण्यासाठी पंढरपूर ते घुमान निघालेल्या सायकल वारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. 75 वर्षाच्या भावे आज्जी देखील या सायकल वारीत सहभागी होणार आहेत. त्या 2 हजार 300 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. ही सायकल वारी महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील स्नेह वाढवणारा ठरेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आज पहाटे या सायकल वारीला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी झेंडा दाखवल्यावर सुरुवात झाली. 


महत्त्वाच्या बातम्या:


Kartiki Ekadashi : उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न, औरंगाबादचं साळुंके दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी