मुंबई: महाराष्ट्रात भोंग्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलंय. मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिल्यानंतर आता त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्य सरकारही आता त्यावर ठोस निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 


राज ठाकरेंच्या भूमिकेवर आता वेगवेगळ्या मुस्लिम संघटनांनीही प्रतिक्रिया दिली आहे. काही मुस्लिम संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे तर काहींनी राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध केला आहे.


रझा अकादमी
रझा अकादमी अध्यक्ष सईद नुरी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने  दिलेल्या गाईडलाईन्स पूर्णपणे पालन मशिदींकडून केले जाईल. मुंबईतील  प्रत्येक मशीदीकडे  लाऊडस्पीकरची परवानगी आहे. ज्या मशिदीकडे लाऊड स्पीकरची परवानगी नाही त्या मशिदींकडून लाऊडस्पीकरची परवानगी घेतली जाईल आणि त्यानुसार नमाज लाऊडस्पीकरवर अदा केला जाणार आहे.


एकमेकांमध्ये समन्वय ठेवून अजान म्हटली जावी: नुरे इलाही मस्जिद 
मशिदींच्या भोंग्यावर पुण्यातील नुरे इलाही मशिदीचे ईमाम अब्दुल शकुर खान नद्वी यांनी म्हटलं आहे की, एक किलोमीटरच्या आतमधे एका पेक्षा जास्त मशीदी असतील तर त्यांनी आपापसात ठरवावं की कोणत्यातरी एकाच मशिदीतून अजान म्हटली जावी. मशिदीतील लाऊडस्पीकरवर अनेक वेळा भाषणे दिली जातात, कव्वाली किंवा गाणी वाजवली जातात, ती लावली जाऊ नये. अजान व्यतिरिक्त मशिदीतील लाऊडस्पीकरवर दुसरे काहीही वाजवले जाऊ नये. मुस्लिम समाजाने स्वतःच्या काही चुका सुधारायला हव्यात, काळानुरूप काही बदल स्वीकारायला पाहिजेत. 


दिवसात पाच वेळा अजान दिली जाते. सुर्योदयापूर्वी, सहा वाजण्याच्या आधी दिली जाणारी अजान  स्पीकरवरुन दिली जाऊ नये. ही अजान आम्ही लाऊडस्पीकरवरून देत नाही. अजान देताना सर्वोच्च न्यायालयाच्या आवाजाच्या मर्यादेचे पालन व्हावे असे अब्दुल शकुर खान नद्वी यांनी म्हटले आहे.  


महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिलन
राज्यात भोंग्याच्या वादावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रातील मुस्लिम विचारवंतांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील शांतता राखण्यासाठी अजान आणि लाउडस्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या आधीदेखील महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिलने हा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबईतील बोरिबंदर येथील अंजुमन इस्लाम शाळेतील ग्रंथालयात 8 एप्रिल रोजी एक बैठक पार पडली. या बैठकीत मुस्लिम समुदायातील विचारवंत, बुद्धीजीवी, कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते


या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, आता महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिलचे कार्यकर्ते आणि बुद्धिजीवी मुस्लिम हे मुस्लिम धार्मिक नेत्यांची, मशिदीचे ट्रस्ट प्रमुख यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. या दरम्यान त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. त्यानुसार, आवाजाची पातळी दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल पातळी राखण्याची विनंती करणार असल्याची माहिती महाराष्ट्र मुस्लिम परिषदेचे प्रतिनिधी आणि शिक्षण तज्ज्ञ सलीम अल्वारे यांनी दिली. 


महत्त्वाच्या बातम्या: