मुंबई: मुलीचे वडील हे तिच्यासाठी तिचे रक्षणकर्ते आणि विश्वासू व्यक्ती असतात, मात्र जन्मदाताच जेव्हा अत्याचार करतो तेव्हा ते प्रकरण अधिक गंभीर असतं असं निरीक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने 40 वर्षीय नराधम बापाला पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी आरोपीनं मुलीच्या त्वचेशी थेट संपर्क न आल्याचा दावा करत 'स्कीन टू स्कीन' या निकालाचा दाखला देत केलेला युक्तिवादही न्यायालयाने फेटाळून लावला. बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयासमोर नुकतीच ही सुनावणी पार पडली. त्या आदेशाची सविस्तर प्रत नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानुसार आरोपीला भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आलं आहे. 


साल 2019 मध्ये शाळेतील शिक्षिकेने पीडितेच्या विचित्र वागण्याची तक्रार तिच्या आईकडे केली होती. मग पीडितेच्या आईनं तिची विचारपूस केल्यानंतर वडिलांनीच आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं तिने आईला सांगितलं. मग आईनेच आपल्या पतीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोक्सो विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एच. सी. शिंदे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी त्वचेचा थेट त्वचेशी संपर्क आला नसल्याचा दावा करत पीडितेची ही तक्रार खोटी असून पत्नी पतीपासून विभक्त होऊ इच्छित असल्यानंच ही तक्रार करण्यात आल्याचा युक्तिवाद केला गेला होता.


मात्र त्यांचा हा युक्तिवाद फेटाळून लावत पिता हा मुलीसाठी तिचा रक्षणकर्ता आणि एक अत्यंत विश्वासू व्यक्ती असतो, त्यामुळे त्याने केलेल्या अशा प्रकारच्या गुन्ह्याचे गांभीर्य अधिक असतं. त्याचप्रमाणे पोक्सो कायद्याच्या कलम 7 अंतर्गत आरोपीनं पीडितेच्या कोणत्या खासगी भागाला, कशाप्रकारे स्पर्श केला त्यावरून गुन्ह्याची गंभीरता निर्दिष्ट केलेली नाही. त्यामुळे इथं त्वचेचा त्वचेला स्पर्श न झाल्याचा युक्तिवाद न्यायालयासाठी धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे. या प्रकरणातील पीडितेने दिलेल हे जबाब सुरुवातीपासून अखेरपर्यंत सारखेच आहेत. तसेच वडिलांनी घडलेला प्रकार कोणालाही न सांगण्याबाबत धमकी दिल्याचा उल्लेखही पीडितेनं आपल्या जबाबात केला आहे. त्यामुळे आरोपीचा हेतू स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण नोंदवत कोर्टानं पीडित मुलीच्या वडिलांवर लैंगिक अत्याचाराचा ठपका ठेवत त्याला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली.


महत्त्वाच्या बातम्या: