West Bengal Election 2021 | गेल्या 17  दिवसांपासून पश्चिम बंगाल निवडणुकीचं कव्हरेज करत होतो. सहज अस वाटलं की पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक प्रचार आणि महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारात फरक काय. महाराष्ट्रात आजपर्यंत निवडणुका कव्हर केल्या आहेत. त्यात 65 ते 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होत नाही, मग पश्चिम बंगालमध्ये  प्रत्येक टप्प्यात 80 टक्के पेक्षा अधिक मतदान का होतं. यासह काही आलेले अनुभव तुमच्या सोबत शेअर करावेत असं वाटलं.


पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील प्रचारातील फरक काय?


मंडळी तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पश्चिम बंगालमध्ये एखाद्या घरावर एखाद्या गल्लीमध्ये एकाच पक्षाचा झेंडा. या ठिकाणी झेंड्यावरून राजकारण फार दिसलं नाही. नाहीतर आपल्याकडे निवडणूक काळात झेंडा लावण्यावरूनही वाद होतात. इथं एकाच खांबावर टीएमसी, भाजपा आणि डाव्या पक्षांचे झेंडे पाहायला मिळाले. केवळ झेंडेच नाही तर उमेदवारांचे फोटो असलेले फ्लेक्सही याच पद्धतीने लावण्यात आले होते. इथे बांबूंच्या साह्याने म्हणजे एका बांबूवर बांबूच्या काड्या लावून झेंड्याचं झाड तयार करण्याची प्रथा आहे.


बहुतेक गावांमध्ये प्रचार सभेला लोक येतीलच असं काही नाही. पण एक गोष्ट मात्र येथे प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे गावातल्या प्रत्येक कोपऱ्याला भाषण ऐकायला जाईल अशी व्यवस्था करण्यात आली होती. मग तिथे एका खांबावर टीएमसी, भाजपा आणि डाव्या पक्षांचा प्रत्येकी एकेक भोंगा होता. बर गावात एका वेळी दोन पक्षाच्या सभा होणार नाहीत, याची काळजीही पक्ष घेत होते. त्यामुळे एकावेळी दोन भोंगे सुरू होण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. बरं या भोंग्याच्या आवाजाची कुणाकडून तक्रार ऐकली नाही.


आजही भिंती चित्रांवरूनच अधिकाधिक प्रचार होतो


आता आपल्याकडे निवडणुकीत आता कोणी भिंती रंगवत नाहीत. पण पश्चिम बंगालमध्ये कोलकाता शहरापासून ते गाव खेड्यांपर्यंत भिंती रंगवून प्रचार केला जातो. मग त्यात व्यंगचित्रावरून एकमेकांवर ताशेरेही ओढले जातात. विशेष म्हणजे जास्तीत जास्त व्यंगचित्र आणि भिंती रंगवण्याचे काम आजही पक्षाचे कार्यकर्ते करतात. त्यांना हे आपलं कार्य आहे असं वाटतं. बरं कार्यकर्त्यांचं पेंटिंग अत्यंत उत्तम, जे चांगल्या चित्रकारांना देखील लाजवेल असं. आणि तिथे बहुतेक जणांना चित्र काढण्याची आवड आहे. बरं असं नाही की कुठेही आणि वाटेल ती भिंत रंगवतात. यासाठी ज्या कोणा व्यक्तीच्या मालकीची ही भिंत आहे, त्याची रितसर परवानगी घेऊन ती निवडणूक आयोगाला देखील कळवली जाते.


जातीवरून उमेदवार ठरत नाही


खरं सांगू का पहिल्यांदा तिथल्या राजकीय विश्लेषकांनी जेव्हा सांगितलं की, जातीपातीचे राजकारण होत नाही. यावर माझा विश्वासही बसला नाही. कारण मी महाराष्ट्रातून गेलो होतो. यासाठी मी अनेकांशी बोललो त्यावेळी प्रत्येकाने हेच सांगितलं. त्यावेळी मी त्याची कारण शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उत्तर मिळालं की आंतरजातीय विवाह इथे खूप मोठ्या प्रमाणावर होतात. त्यामुळे जातीपातीचे नात्यागोत्याचा राजकारणाला इथे फारसा वाव मिळत नाही. यावेळी मात्र धर्माचं राजकारण येथे नक्की पाहायला मिळालं. दोन धर्मात मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी जो प्रचार केला जात होता तो काही प्रमाणात इथल्या मतदारांच्या मनावर रुजलेला पाहायला मिळाला.


पश्चिम बंगालमधील का होत 80 टक्के पेक्षा अधिक मतदान?


मतदानाविषयी इथे प्रत्येक नागरिक जागरूक आहे. मतदानाच्या रांगेत उभा राहण्याचा त्याला कंटाळा येत नाही. मग तो शहरी भाग असू देत नाहीतर एखादा खेडं. सात वाजताच्या मतदानाला काही लोक साडेपाच वाजता येऊन रांगेत उभा राहतात. हे मी प्रत्यक्ष पाहिले. बर महिलांचा उत्साह देखील खूप मोठा. भर उन्हात महिला छत्री घेऊन रांगेत उभा असलेल्या मी पहिल्या आहेत. आता हे निश्चित सांगता येणार नाही, पण बहुतेक महिला असं म्हणतात की आम्ही आमच्या मनानं मतदान करतो. आमचे पती यात हस्तक्षेप करत नाहीत. बरं इथे कुणाला रिक्षा, गाडी मतदानासाठी द्यावी लागत नाही. ना त्यांना घरी जाऊन मतदान करा असं सांगावं लागतं. लोक स्वतःहून मतदान केंद्रावर येतात तासंतास लाईनमध्ये उभा राहतात आणि आपला मतदानाचा हक्क बजावतात. मग सांगा का बरं मतदानाची टक्केवारी 80 पेक्षा अधिक होणार नाही.


निवडणूक काळात इथे हिंसाचार होते का?


निवडणूक काळात इथे अनेकदा हिंसाचार होतो. प्रचार करण्यावररून भांडणं होतात. खून मारामाऱ्या होतात. मतदानाच्या दिवशीही काही भागातील चित्र निश्चित वेगळं आहे. त्या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीत हिंसा होते, दगडफेक, मारामारी एवढेच नाही तर काही ठिकाणी बॉम्ब फेकण्याची देखील इतिहासात नोंद आहे. या निवडणुकीत पहिल्या तीन टप्प्यात काही ठिकाणी मारहाण आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. कार्यकर्ते आपल्या पक्षाविषयी प्रचंड कट्टर आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ज्या ज्या नेत्यांनी  निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलला त्यांच्यावर झालेल्या हल्याचं प्रमाण अधिक आहे. या अशा घटनांचा अपवाद वगळता इथली निवडणूक ही तशी चांगली होते. लिहिलेल्या प्रत्येक बाबतीत अपवाद निश्चित आहे. पण मतदानाच्या दिवशीचा मतदान करण्याचा उत्साह निश्चितच कौतुकास्पद आहे. हे नक्की.


(पश्विम बंगाल निवडणुकीच्या वार्तांकनासाठी गेलेल्या एबीपी माझाचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांचा अनुभव)