दिवाळी म्हणजे फराळ ,दिवाळी म्हणजे रांगोळी ,दिवाळी म्हणजे आकाशकंदील आणि दिवाळी म्हणजे फटाके. खरंच, फटाक्यांशिवाय राव दिवाळीची खरी मजा नाही असं अनेकांचं मत असेल. विविध प्रकारचे आणि रोषणाई करणाऱ्या फटाक्यांमुळे दिवाळीची मजा आणखीनच वाढते. पण गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणमुक्त दिवाळीचा अर्थात इको फ्रेंडली दिवाळीचा आग्रह धरला जातो.



फटाक्यांमुळे वाढणाऱ्या प्रदूषणामुळे सर्वोच्च न्यायालयाने देखील गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे साहजिकच फटाकेमुक्त दिवाळी या पर्यायाचा विचार केला जातो.. पण कसं आहे.. जिथे इच्छा तिथे मार्ग म्हणूनच ग्रीन फटाक्यांचा पर्याय समोर येतोय. हे ग्रीन फटाके खरंच प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक असतात का? जाणून घेऊया

ग्रीन फटाके म्हणजे काय?

ज्या फटाक्यांमुळे प्रदूषण कमी होतं, जे फटाके पर्यावरणपूरक आहेत, त्यांना ग्रीन क्रॅकर्स किंवा हरित फटाके असं म्हटलं जातं. हे ग्रीन फटाके नेहमीच्या फटाक्यां प्रमाणे दिसतात. यामध्येही फुलबाजी, फ्लॉवरपॉट, स्काय शॉट असे प्रकार मिळतात. हे फटाके काडेपेटीच्या साह्याने उडवले जातात. याशिवाय या ग्रीन फटाक्यांमध्ये सुगंध असणारे फटाकेही असतात आणि वॉटर फटाके असतात. हे फटाके उडवण्याची पद्धत वेगळी असते.

ग्रीन फटाक्यांमध्ये मटेरियल काय असतं?

हे फटाके वेगळ्या पद्धतीने तयार केले जातात. या फटाक्यांमुळे प्रदूषण अजिबात होत नाही असं नाही; पण नेहमी फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांपेक्षा सरासरी 30 ते 40 टक्के कमी होऊ शकतं असा दावा केला जातो. तसंच ग्रीन फटाक्यांमध्ये प्रदूषण वाढवणारी हानिकारक रसायनं नसतात. त्यात अॅल्युमिनियम, बेरियम, पोटॅशिअम नायट्रेट आणि कार्बन वापरलं जात नाही. हे घटक वापरलेले असले, तरी त्यांचं प्रमाण अत्यल्प असतं. त्यामुळे वायू प्रदूषण कमी होतं. या फटाक्यांमुळे रोषणाई होते. हे फटाके नेहमीच्या फटाक्यांसारखेच असतात; मात्र ते पर्यावरणपूरक असतात हे महत्वाचं. हे फटाके उडवताना धूर निघतो पण त्याचं प्रमाण अगदी कमी असतं.

कुठे मिळतात ग्रीन फटाके आणि किंमत किती?

गेल्या काही वर्षांपर्यंत काही ठरावीक संस्थाच या पर्यावरणपूरक फटाक्यांची निर्मिती करत होत्या. आता मात्र मोठ्या प्रमाणावर या फटाक्यांचं उत्पादन होऊ लागलं आहे. त्यामुळे सरकारमान्य नोंदणी असणाऱ्या दुकानांमध्ये हे फटाके मिळू शकतील.

हे फटाके सर्वसाधारण फटाक्यांपेक्षा थोडेसे महाग असतात. म्हणजे जे फटाके एरव्ही 250 रुपयांना मिळतात, त्याच प्रकारच्या ग्रीन फटाक्यांसाठी सुमारे 400 रुपये खर्च करावे लागू शकतात.

वॉटर रिलीजर क्रॅकर

या प्रकारच्या हिरव्या फटाक्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पेटवल्यानंतर त्यात पाण्याचे कण तयार होतात. यामुळे फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण कमी होतं. फटाके जाळल्यानंतर तयार होणाऱ्या पाण्याच्या रेणूमध्ये सल्फर आणि नायट्रोजनचे कण विरघळतात.

सफल क्रॅकर

या प्रकारचे फटाके बनवताना अॅल्युमिनियमचे प्रमाण सामान्य फटाक्यांच्या तुलनेत खूपच कमी असते. जरी अॅल्युमिनियमचा वापर 50 ते 60 टक्के कमी झाला तरी त्याला सुरक्षित किमान अॅल्युमिनियम म्हणतात. अशाप्रकारे, हे फटाके प्रदूषण नियंत्रणात अत्यंत प्रभावी ठरतील.

स्टार क्रॅकर

त्याच्या नावाप्रमाणेच असे फटाकेही एखाद्या तारेपेक्षा कमी नाहीत. ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर स्टार क्रॅकर म्हणजेच सेफ थर्माईट क्रॅकरच्या निर्मितीमध्ये केला जात आहे. त्यामुळे ते जाळल्यावर घातक सल्फर आणि नायट्रोजन वायू अत्यंत कमी प्रमाणात तयार होतो आणि हवेचे प्रदूषणही सुमारे पन्नास ते साठ टक्क्यांनी कमी होते.

अरोमा फटाके

हे अगदी वेगळ्या प्रकारचे फटाके आहेत. नीरीने उत्पादित केलेले हे फटाके कमी हानिकारक वायू तयार करतात, तसेच ते जाळल्याने एक सुखद सुगंध देखील उत्सर्जित होतो...

आपल्याला दिवाळी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करायची असेल, तर ग्रीन फटाक्यांचा पर्याय चांगला आहे. वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण न करणारे फटाके आपल्याला आणि मुख्य म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी पर्यावरणाचा समतोल फार बिघडू देणार नाहीत. ग्रीन फटाके उडवून दिवाळीची नेहमीसारखी मजा लुटता येऊ शकेल. दिवाळी फटाकेमुक्त करण्यापेक्षा ग्रीन फटाके उडवून नेहमीसारखीच दिवाळी साजरी करणं चांगलं.