Weather Update Today : उत्तर भारतातून (India Weather Update) मान्सूनच्या (Monsoon) परतीच्या प्रवासाला सुरुवाता झाली असली तरी अजूनही अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. राज्यासह देशात काही ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) येत्या 24 तासांत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीसह गोव्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 


मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची हजेरी


ठाणे, मुंबईसह राज्यात आजही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. काही भागांत ढगाळ वातावरण दिसून येईल, असं हवामान विभागाने सांगितलं आहे. महाराष्ट्रात पुढील 24 तासांत अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. पुढील 24 तासांत महाराष्ट्र, गोवा आणि लगतच्या इतर शहरांमध्ये ताशी 65 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. यासोबतच हवामानातही लक्षणीय बदल होऊ शकतो. 


कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट


पुढील 24 तासांत अतिवृष्टीची शक्यता असल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर, पूर्व मध्य अरबी समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर राहील. महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीवर 55 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या विविध भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम


मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाल्याने 5 ऑक्टोबरपर्यंत राज्यासह विविध ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंडमध्ये 5 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओरिसामध्ये 6 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहील, असंही हवामान विभागाने सांगितलं आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर जोरदार पाऊस सुरु आहे. छत्तीसगडमध्ये पावसाचा जोर वाढल्याचं दिसत आहे. ईशान्य भारतात आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड आणि त्रिपुरामध्ये 4ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तिरुअनंतपुरम, कोल्लममध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमधील चार जिल्ह्यांमध्ये वादळासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


Pune ST Bus Accident : दोन एसटी चालकांच्या शर्यतीत निरपराध नागरिकाने प्राण गमावले? पोलीस म्हणतात...