नांदेड :  नांदेड येथील शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital ) नवजात बालकांसह 24 जण रुग्णांच्या मृत्यूमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. एवढ्या प्रमाणात रुग्ण दगावल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले असताना आता रुग्णालयाकडून याबाबतचे स्पष्टीकरण समोर आले आहे. 


नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 24 तासात 24  रुग्णांचे मृत्यू झाले हे मृत्यू का झाले याची काय करणे आहेत खरच रुग्णालयात औषध नाहीत ? डॉक्टर नाहीत का? इतर 70 अत्यवस्थ रुग्ण का झाले या सर्व प्रश्नांची उत्तरे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस. आर. वाकोडे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय मदनुरकर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहेत. 


आमच्या रुग्णालयात अत्याधिक गंभीर अवस्थेत दररोज 12 ते 14 रुग्ण दाखल होतात आणि त्यात काहींचा मृत्यू होतो असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांनी सांगितले.लहान मुलांचा मृत्यू हा नैसर्गिक आणि प्रौढ रुग्णांचा मृत्यू हा व्याधी आणि वय झाल्यामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले. त्याशिवाय,  मृतांमधील इथे आलेले रुग्ण हे अतिशय गंभीर होते.  सर्वतोपरी प्रयत्न करून ही अशा रुग्णांना वाचवता येत नसल्याचेही डॉ. वाकोडे यांनी सांगितले. गंभीर आजारामुळे 12 रुग्णांचा मृत्यू झाला. तर, लहान मुले ही अतिशय क्रिटिकल परिस्थितीत इथे दाखल झाले होते असे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी बचावात म्हटले.  


रुग्णालयात कुठल्याही औषधांची कमतरता नसल्याचे डॉ. वाकोडे यांनी म्हटले.  डॉक्टर आणि कर्मचारी वर्गदेखीलही पुरेसा आहे. आमच्या रुग्णालयात 5 जिल्ह्यातून रुग्ण येतात. सर्व रुग्णांच्या प्रकृतीबाबत आम्ही पूर्ण काळजी घेतो. 
आमच्याकडे सापाने दंश केल्यावर उपचारासाठी अँटी स्नेक वेनोम औषध उपलब्ध आहेत. महागडी औषध ही आम्ही स्थानिक स्तरावर खरेदी करत असल्याचे डॉ. वाकोडे यांनी म्हटले. 


रुग्णालय प्रशासनाने काय म्हटले?


नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात  30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 12 प्रौढ रुग्ण (5 पुरुष, 7 महिला) व 12 नवजात शिशु रुग्ण होते. प्रौढ रुग्णामध्ये 4 हृदयविकार, 1 विषबाधा, 1 जठरव्याधी, 2 किडनी व्याधी, 1 प्रसूती गुंतागुंत, 3 अपघात आणि इतर आजाराने तर  बालकांपैकी 4 अंतिम अवस्थेत खाजगीतून संदर्भित झाले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्यावश्यक औषध साठा उपलब्ध आहे. जिल्हा नियोजन माध्यमातून या आर्थिक वर्षासाठी 12 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. त्याशिवाय, अजून 4 कोटी रुपये मंजूर झाला आहे असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आलेले आहे.