Nanded News: महाराष्ट्रातील (Maharashtra News) नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital) गेल्या 24 तासांत 12 नवजात बालकांसह अनेकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या डीननं यामागे औषधं आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचं कारण सांगितलं आहे. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शंकरराव चव्हाण यांनी सांगितलं की, गेल्या 24 तासांत झालेल्या 24 मृत्यूंपैकी 12 मृत्यू विविध आजारांमुळे झाले असून सर्वाधिक मृत्यू हे सर्पदंशामुळे झाले आहेत. याच घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप सरकार हजारो कोटी प्रचारावर खर्च करते, पण लहानग्यांच्या औषधांसाठी पैसे नाहीत? असा परखड सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. 


राहुल गांधींकडून दुःख व्यक्त, भाजपवर डागलं टीकास्त्र 


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "नांदेडच्या शासकीय रुग्णालयात औषधांच्या कमतरतेमुळे 12 नवजात बालकांसह 24 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. भाजप सरकार हजारो कोटी रुपये प्रचारावर खर्च करते. पण मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत? भाजपच्या नजरेत गरिबांच्या जीवाला किंमत नाही." 






रुग्णालयाचे डीन काय म्हणाले? 


डीन डॉ. श्यामराव वाकोडे यांनी सांगितलं की, गेल्या 24 तासांत 12 बालकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, येथे लांबून रुग्ण येतात. काही दिवसांपासून येथे रुग्णांची संख्या वाढल्यानं बजेटचाही प्रश्न निर्माण झाला आहे. डीननं सांगितलं की, तिथे एक हाफकिन इन्स्टिट्यूट आहे. त्यांच्याकडून औषधं घ्यायची होती पण घेता आली नाही. मात्र आम्ही स्थानिक पातळीवर औषध खरेदी करून रुग्णांना दिली. 






दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 


नांदेडमधील रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. या प्रकरणी अधिक माहिती घेतली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.