Weather Update Today : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऊन-पाऊस (Unseasonal Rain) अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा विरल्याने पावसाची रिमझिम कमी झाली आहे. असं असलं तरी राज्यासह देशात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. तर त्यानंतर पुढील आठवड्यापासून थंडीचा जोर वाढणार आहे.
आजही अवकाळी पावसाची हजेरी
आयएमडीच्या माहितीनुसार, येत्या देशात पावसाचा नवा टप्पा सुरु होण्याची चिन्हं दिसत आहेत. कोकण किनारपट्टीसह गोवा, तामिळनाडू, केरळमध्ये दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाची जोरदार हजेरी असेल, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे देशातील अनेक भागात हवामान ढगाळ राहणार आहे. यामुळे देशासह राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांसह कोकणात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तर, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
'या' जिल्ह्यात पावसाचा अंदाज
अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टी विरला असला तरी, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून यामुळे देशभरातील हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम वायव्य दिशेकडे सरकणारा बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होणार आहे. यामुळे गेल्या दोन दिवसात दक्षिणेतील केरळ, तामिळनाडूमध्ये पाऊस झाला आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर आणि सांगली तसेच पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात घट पाहायला मिळणार असून हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज आहे.
गारठा वाढणार
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि इतर भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय आसाम, मणिपूर, मिझोरम आणि नागालँडमध्ये मुसळधार पाऊस पडेल. याशिवाय ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही किनारपट्टीच्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यामध्ये सतपारा, पुरी, जगतसिंग, केंद्रपारा, नंदीग्राम आणि दक्षिण 24 परगणा येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ
बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाच्या पट्ट्याचं शुक्रवारी चक्रीवादळात रूपांतर झालं आहे. हे चक्रीवादळ कमाल 80 किमी प्रतितास वेगाने बांगलादेश किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटलं आहे की, 'मिधिली' चक्रीवादळ 17 नोव्हेंबरच्या रात्री किंवा 18 नोव्हेंबरच्या सकाळी बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :