Weather Update Today : देशासह राज्यात थंडीचा कडाका (Cold Weather) वाढत आहे. आज देशभरात काही ठिकाणी पावसाचा अंदाज (Rain Prediction) वर्तवण्यात आला असून काही भागात हवामान कोरडं राहणार आहे. महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज नाही. तामिळनाडू, केरळ, कर्नाटकसह लक्षद्वीप बेटावर आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जम्मू आणि काश्मीरसह लडाखमध्येही आज अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल, असं आयएमडीने म्हटलं आहे.


चक्रीवादळामुळे हवामानात बदल


बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाल्याने त्याचा परिणाम हवामानावर होताना दिसत आहे. अंदमान आणि निकोबार बेटावर आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील काही दिवस तापमानात घट होणार असून कोरडं वातावरण राहणार असल्याचं म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम, मणिपूर, मेघालयसह ओडिसा आणि झारखंडमध्येही जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे.


महाराष्ट्रातील हवामान कसं असेल?


राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाही. पण, गारठा वाढणार आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणसह विदर्भात आज कोरडं वातावरण पाहायला मिळणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पहाटे आणि रात्री तापमानात घट होताना पाहायला मिळेल. तर, दुपारी तापमानात किंचित वाढ होऊन हवामान कोरडं राहिलं, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


थंडीचा कडाका वाढला


बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे ईशान्येकडून भारतापर्यंत तीव्र वारे वाहत आहेत. यामुळे बर्‍याच ठिकाणी पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. तर, काही ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाला असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. 


'या' भागात मुसळधार पावसाचा अंदाज


आजपासून पुढील दोन दिवस तामिळनाडू आणि केरळमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. आज 21 नोव्हेंबरला आंध्र प्रदेश किनारपट्टी भागात पावसाची दाट शक्यता आहे. 22 आणि 23 नोव्हेंबर काळात कर्नाटकमध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळेल. 22 आणि 23 नोव्हेंबरला केरळ आणि माहेमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी दाट धुक्याची चादरही पाहायला मिळणार आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या भागांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Air Pollution : दिवाळीत हवा बिघडली! आरोग्यावर वाईट परिणाम; राज्यातील हवा प्रदूषणाची परिस्थिती काय?