Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून हवामान बदल (Weather Update) झालेला दिसत आहे. राज्यासह देशात (India) एकीकडे हवेतील गारवा वाढलेला (Cold Weather) जाणवत आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्र (Maharashtra) सह काही देशात काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम राज्यासह देशातील हवामानावर होत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील काही भागात पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


राज्यात दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज


राज्याच्या काही भागात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण तामिळनाडूमध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे. गोव्यासह तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही सध्या जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. राज्यात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी आकाश निरभ्र तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील.


प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ


देशात एकीकडे गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे, पण त्याच बरोबर हवेची पातळी घसरली आहे. धुके आणि धुलिकणांमुळे मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशात अनेक शहरांत प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धुक्याची पांढरी चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार, मंगळवारी रात्री उशिरापासून जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या उच्च उंचीच्या भागात नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स प्रवेश करेल. यामुळे काही भागात पावसाची शक्यता आहे. 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. त्याचवेळी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 8 ते 10 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सुरू राहू शकतो. 


उत्तर-पश्चिम भारतात अवकाळी पावसाची शक्यता


राजस्थान आणि पंजाबमध्येही 8 ते 9 नोव्हेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर-पश्चिम भारतात अवकाळी पाऊस पडू शकतो. 10 नोव्हेंबरपर्यंत दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशात मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि माहेमध्ये 8 नोव्हेंबरपर्यंत, तर तामिळनाडू आणि कराईकलमध्ये 10 नोव्हेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, केरळ, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.