मुंबई: महाराष्ट्रातील काही भागात थंडीमुळे हुडहुडी भरलेली असताना आता तापमानाचा पारा पुन्हा घसरणार असल्याची शक्यता आहे. येत्या 48 तासांत पुणे, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून  कडाक्याच्या थंडीने उत्तर महाराष्ट्र सध्या चांगलाच गारठला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर कडाक्याची थंडी पडली आहे. सध्या उत्तर भारत (North India) चांगलाच गारठला आहे. राजधानी दिल्लीत थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. किमान तापमान 5 अंशांवर गेले असून दृश्यमान्यता 50 मीटरपेक्षाही कमी आहे.  पुढील दोन दिवस तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 


औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद विदर्भतील काही भागात थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील  काही जिल्ह्यात थंडीची लाट येऊ शकते तर पुढील आठवड्यात मुंबईतील तापमानातही मोठी घट होण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. 13 आणि 14 जानेवारी दरम्यान मुंबईतील तापमानातही घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


वेण्णालेक तापमान 6 अंशावर


वेण्णालेक मधील तापमान घसरले असून वेण्णालेक  6 अंश तर महाबळेश्वर 9 अंशावर गेले आहे. तर  साताऱ्यातीलही तापमान 11 अंश सेल्सिअस आहे. 


निफाडमध्ये पारा 5 तर नाशिकमध्ये 8 अंशांपर्यंत


कडाक्याच्या थंडीने नाशिककर सध्या चांगलेच गारठले आहेत. निफाडमध्ये पारा 5 तर नाशिकमध्ये 8 अंशांपर्यंत खाली घसरला असून स्वेटर घातल्याशिवाय घराबाहेर पडणंही त्यांना अवघड झाले आहे


परभणीत थंडीची लाट कायम, आज तापमान 6.4 अंशावर 


परभणी जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून थंडीची लाट कायम असून तापमान हे अत्यंत कमी झाले आहे. काल जिल्ह्याचे तापमान हे 5.7 अंशावर होते. आजही जिल्ह्याचे तापमान 6.4 अंश असून सर्वत्र गारठा पसरला आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही शेकोट्या पेटत आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या देखील घटली आहे. दरम्यान दिवसभर सर्वत्र थंडगार वारे सुटत असून ज्यामुळे जिल्हा गारठून गेला आहे


धुळे जिल्ह्यातील तापमान पाच अंश सेल्सिअसवर 


धुळे जिल्ह्यातील तापमान पाच अंश सेल्सिअसवर आले असून यामुळे दिवसभर वातावरणात गारठा पसरल्याने जनजीवन 
जीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला.  रोज सकाळी सात वाजता भरणाऱ्या शाळा आता पाऊण तास उशिरा भरविण्यात येणार आहे. या कडाक्याच्या थंडीचा परिणाम जनजीवनावर झाला आहे तसाच रब्बी हंगामाच्या पिकांवर देखील झाला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर पसरत असल्याने याचा परिणाम गहू हरभरा आणि कांदा या पिकांवर होत आहे.