Marathwada Rain Update: यंदा पावसाचे (Rain) आगमन उशिरा झाले आहे. त्यामुळे पाऊस कधी पडतो याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे (Farmers) लक्ष लागले आहेत. तर मराठवाड्यातील (Marathwada) बळीराजा देखील पावसाची आस लावून बसला आहे. मात्र पाऊस कधी पडणार याचा काहीच भरोसा नाही. दरम्यान मराठवाड्यात 23 जूनला पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे दोन दिवसांनी मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 23 जूनला मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यात, तर 24 जून रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावेळी वाऱ्याचा वेग अधिक ताशी 30 ते 40 किमी राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात 23 ते 29 जूनदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा अधिक
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात 23 ते 29 जूनदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. तर विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात 25 जून ते 1 जुलैदरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे असणार आहे. तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अजूनही मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झालेलं नाही. त्यामुळे अशात शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस म्हणजेच 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी, तज्ज्ञ देत आहे.
पेरण्याची घाई करू नका...
जून महिना सुरु होताच अनेक शेतकरी बी-बियाणे खरेदी करण्यास सुरवात करतात. यावेळी देखील मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केली आहे. पण असे असलं तरीही पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नयेत असे आवाहन कृषी विभागसह तज्ज्ञ करत आहे. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस म्हणजेच 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी केली पाहिजे. मात्र अनेकदा शेतकरी थोडाफार पाऊस पडला आणि शेती ओली झाली की लगेच लागवड सुरु करतात. मात्र पुढे पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची वेळ येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता योग्य पाऊस झाल्यावरच पेरणी करावी असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: