मुंबई : महाराष्ट्रात 23 जूननंतर पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान (IMD) खात्याने वर्तवला आहे. पेरणीसाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट येऊ शकते, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.तर राजस्थानमध्ये बिपरजॉयमुळे 100 वर्षातील सगळ्यात जास्त पाऊस झाला आहे बाडमेर, पाली, राजसमंद, भीलवाडा, अजमेरसह अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा
विदर्भात काल सरासरी तापमान 40 अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून तापमानवाढीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यवतमाळ, वाशिम, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांत काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे .
'या' राज्यात पावसाची शक्यता
राजस्थानमधील भरतपूर, धौलपूर, करौली जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवार 21 जूनपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बिहार, महाराष्ट्र, ओडिशा, आसाम, पश्चिम बंगाल, सिक्कीम, पश्चिम मध्य प्रदेशात पावसाची शक्यता आहे. याशिवाय तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेट, केरळ आणि पश्चिम हिमालयात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात पावसामुळे तापमानाात घट
राजधानी दिल्लीतील पावसानंतर तापमानात घट झाली आहे.आज राजधानीत कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तसेच हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातही उन्हाच्या झळा सोसत नागरिकांना काल झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत आहे. पुढील काही दिवस वातावरण असेच राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रात अद्याप पावसाची प्रतिक्षा कायम
सध्या राज्यातील बळीराजा पावसाच्या (Rain) प्रतिक्षेत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांची कामं खोळंबल्याचे चित्र दिसत आहे. सध्या मृग नक्षत्र सुरु आहे. अद्यापही या नक्षत्रात पाऊस झाला नाही. पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. मात्र, पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे. अशीच स्थिती राहिल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. कृषी विभागाने खते, बियाणांचे नियोजन केले आहे. परंतु पाऊस नसल्याने खते, बियाणे पडून असल्याची स्थिती आहे. दरम्यान, चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करुन नयेत असे आवाहन कृषी विभागानं केलं आहे.